खामगाव : महाराष्ट्रातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक व विविध प्रश्नांचा सर्वंकष विचार करून स्वतंत्र धोरण तयार करण्याच्या दिशेने राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. एकल महिला धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी शासनाने राज्यस्तरीय समिती गठित केली असून, या समितीच्या माध्यमातून एकल महिलांच्या समस्या, त्यांच्या गरजा तसेच विविध विभागांकडून उपलब्ध असलेल्या योजनांचा अभ्यास करण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाचे खामगाव शहर अध्यक्ष अध्यक्ष डॉ. संतोष तायडे यांनी खामगाव मधील एकल महिलांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष वेधले आहे.

पतीचे निधन झालेल्या, घटस्फोटित, परित्यक्ता तसेच विविध कारणांमुळे एकट्याने कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिलांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व प्रशासकीय पातळीवर अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अनेक महिलांना शासनाच्या विविध योजनांची माहिती नसते, तर काही महिलांना कागदपत्रे, पात्रता व प्रशासकीय प्रक्रियेमुळे योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येतात.

यासंदर्भात डॉ. संतोष तायडे म्हणाले की, “एकल महिलांचे प्रश्न केवळ एका योजनेपुरते मर्यादित नाहीत. त्यांच्या सन्मानाने जगण्याचा, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचा आणि शासनाच्या योजनांचा सहज लाभ मिळण्याचा प्रश्न आहे. राज्य शासनाने एकल महिला धोरण तयार करण्यासाठी घेतलेला पुढाकार स्वागतार्ह आहे. मात्र, धोरण तयार करताना ग्रामीण व तालुका स्तरावरील महिलांचे वास्तव, त्यांच्या अडचणी आणि त्यांच्या अपेक्षा शासनापर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे.”

खामगाव तालुक्यातील एकल महिलांच्या समस्या व सूचना संकलित करून त्या संबंधित शासकीय यंत्रणा व राज्यस्तरीय धोरण प्रक्रियेकडे पाठविण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

“प्रत्येक एकल महिलेला शासनाच्या योजनांची माहिती, आवश्यक मार्गदर्शन आणि हक्काचा लाभ मिळाला पाहिजे. यासाठी प्रशासन, सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता आहे. खामगाव तालुक्यातील एकल महिलांचे प्रश्न संघटितपणे मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्ष सातत्याने प्रयत्नशील राहील,” असे डॉ. संतोष तायडे यांनी स्पष्ट केले.

या उपक्रमाच्या माध्यमातून खामगाव तालुक्यातील एकल महिलांशी संवाद साधून त्यांच्या प्रमुख समस्या, शासन योजनांबाबतची माहिती, आवश्यक कागदपत्रांमधील अडचणी तसेच त्यांच्या सूचना संकलित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत पक्षाचे सोशल मीडिया तालुका अध्यक्ष युसूफ फाखरी यांच्या मोबाईल नंबर ९८९०७३९८७४ वर संपर्क करून सहकार्य मिळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.

एकल महिलांच्या सन्मानासाठी, स्वाभिमानासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी खामगाव तालुक्यातून संघटित आवाज उभारण्याची गरज असून, या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्ष सक्रियपणे काम करणार असल्याचे डॉ. संतोष तायडे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post