*
*
*गडब/ अवंतिका म्हात्रे*
🔵 *जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा निर्णय*
🔵 *गटविकास अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर*
पेण तालुक्यातील पाबळ ग्रामपंचायतीच्या २०१९ च्या थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंच म्हणून निवडून आलेल्या राजश्री राजाराम जाधव यांनी जात प्रमाणपत्र जोडून निवडणूक लढवली होती व त्या निवडूनही आल्या, ते जात प्रमाणपत्र चौकशी अंती बोगस असल्याचा निर्णय जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला आहे.
पाबळ सरपंच राजश्री जाधव या २००२ साली याच जातीच्या दाखल्यावर सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. तर २००७ साली पेण पंचायत समितीच्या पाबळे गणातून खोटे कागदपत्र जोडून प्रमाणपत्रावर खाडाखोड करत मराठा ऐवजी कुणबी म्हणून नोंद करून शासनाची फसवणूक करत सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. आता २०१९ च्या पाबळ ग्रामपंचायतीची थेट सरपंच पदाची निवडणूक बोगस जात प्रमाणपत्राचे आधारे लढवून निवडणूक
जिंकली आहे. याबाबत याच निवडणुकीतील सरपंच पदाच्या उमेदवार राजश्री नरेश शिंदे यांनी राजश्री राजाराम जाधव यांच्या जातीच्या दाखल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याबाबत तक्रारदार यांनी जोडलेल्या सबळ पुराव्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती रायगड यांना १६ जून २०२२ ला पुर्नतपाराणी करण्याचे आदेश दिले.या आदेशानुसार समितीच्या दक्षता पथका मार्फत प्रत्यक्ष तपासणी केली असता सरपंच राजाराम जाधव उर्फ लता गणपत ठाकूर यांनी सादर केलेल्या नागोठणे येथील शाळा सोडल्याचा दाखला हिंदु मराठा म्हणून आढळून आला. तसेच त्यांचे प्राथमिक शिक्षण वांगणी तालुका रोहा येथील शाळेत झाले असून तेथील दाखला सुध्दा हिंदू मराठा म्हणून आढळून आला आहे.
हा जातीचा दाखला काढताना सोबत जोडलेला प्रभाकर महादु ठाकूर यांच्याही शाळा सोडल्याच्या दाखल्यावर हिंदु मराठा नोंद आहे, तसेच महादेव तात्या ठाकूर यांची रोहा तहसिलदार गाव नमुना १४ मध्ये मराठा अशी नोंद दक्षता पथकाला आढळून आली. पाबळ दक्षता समितीने वांगणी तालुका रोहा ग्रामस्थांकडे देखिल चौकशी केली असता त्यांची जात मराठा असल्याचे समितीच्या निदर्शनास आले.या दक्षता पथकाने आपला अहवाल जिल्हा जात प्रमाणपत्र समिती रायगड यांच्याकडे सादर केल्यानंतर २३ सप्टेंबर २०२२ रोजी विद्यमान सरपंच राजश्री राजाराम जाधव यांचा दाखला रद्द करण्याचे आदेश दिल्याने पाबळ सरपंच राजश्री जाधव यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. परिणामी पाबळ मध्ये आता नव्या सरपंच होणार या बाबत आता चर्चांना उधाण आले आहे.
*पेण गटविकास अधिकारी पोळ यांना विचारले असता, या प्रकरणी अहवाल आला असून याबाबत कारवाईसाठी जिल्हाधिकारी यांना अहवाल पाठवला आहे, असे त्यांनी सांगितले.*

Post a Comment