अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी केमिस्ट कोहीनूर तथा खामगाव रत्न आदरणीय अनिलभाऊ नावंदर
अष्टपैलू हा शब्द बहुतेक हिऱ्याचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. जसा हिरा मौल्यवान असतो पण त्याचे खरे मुल्य पैलू पाडल्यावरच कळते. त्यासाठी हिऱ्याला 8 पैलू पाडले जायचे. जेणे करून त्याचे गुणधर्म व मुल्य ठरविता यायचे. हाच विचार वापरून व्यक्तीचे गुण व मुल्य त्याचे महत्व ठरवितांना विचारात घेवून व्यक्तीचे सामाजिक, आर्थिक, व्यावसायिक मुल्य ठरविले जाते. ज्या व्यक्ती जवळ अनेक गुण असतात त्याला अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची व्यक्ती समजतात. प्रत्येक व्यक्ती जन्मतः वेगळी आणि विशेष असते. प्रत्येकात एक वेगळी खासियत असते. जिच्यामुळे आपण इतरांपेक्षा वेगळे असतो. हा वेगळेपणाच ठरवतो कि आपण कोण आहोत, कसे आहोत. अष्टपैलू हे एक हरहुन्नरी आणि विकसित व्यक्तिमत्व असते. अशा व्यक्ती आळस, अनुत्साह यात अडकत नाही. आपल्या वैशिष्ट्यांना कोणत्याही प्रतिकाराशिवाय आणि आपल्या सीमांच्या बंधनांना त्यागाने शिकतात. अष्टपैलू व्यक्ती कोणतेही काम अति उत्साहाने करतो आणि त्यांची काम करण्याची रीत इतरांपेक्षा उत्कृष्ट असते. बुद्धिचातुर्य , परिपक्व विचार, प्रभुत्वप्रियता, आनंदी, कार्य-सातत्य, साहसप्रियता, स्वतंत्रवृत्ती, सुसंस्कृत सफाईदारपणा, समजूतदार वृत्ती आणि विवेकशीलता असे गुण अष्टपैलू व्यक्ती मध्ये असतात. म्हणूनच लिव्हींग ऑफ आर्टचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी म्हटले आहे की, “या सृष्टीच्या इतिहासात तुमच्यासारखे कुणी नाही आणि अनंत काळापर्यंत तुमच्या सारखे कोणी होणारही नाही, तुम्हीच आद्य आहात. तुम्ही दुर्मिळ आहात. तुम्ही अद्वितीय आहात. असे एकमात्र असल्याचा आनंद साजरा करा.” अशाच प्रकारचे अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी असलेले खामगाव रत्न मा. श्री. अनिलभाऊ नावंदर यांचा आज वाढदिवस. या शुभदिनी त्यांना अनंत कोटी शुभेच्छा.
![]() |
| जाहिरात |
मा. अनिलभाऊ नावंदर यांचा थोडक्यात जीवनपट उलगडला तर त्यांच्या कार्यकर्तृत्वाची अनुभूती होईल. मनुष्याने विधायक कार्यासाठी प्रयत्न करीत राहणे हे आपले कर्तव्य आहे, ते करीत रहा, कदाचित सगळेच मनासारखे घडणार नाही, परंतु प्रयत्न केल्याचे समाधान निश्चित मिळेल, अशा विचारांचे अनिलभाऊ नावंदर यांनी रजतनगरी मध्ये पाऊल टाकताच वैद्यकीय व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या कष्टाळू व प्रामाणिक वृत्तीने शून्यातून विश्व निर्माण केले. आजच्या गतीमान जीवनात नाती जपणे तसे अवघडच. तरीसुध्दा व्यावसायिक वृध्दीसोबतच गावासोबत नाळ जोडली. सर्व सुखसोयी उपलब्ध असतानाही आपले पाय जमिनीवर ठेऊन नम्रतेने आपले कर्तव्य बजावले व प्रेम, करूणा,जिव्हाळा, आपुलकी, माणुसकी, यांनी ओतप्रोत भरलेला सच्चा मित्र, मार्गदर्शक, गुरू, आधारवड असे आपले बहुरंगी जीवन समाजासमोर ठेवून एक आदर्श निर्माण केला आहे. आतापर्यंत व्यावसायिक, राजकीय व सामाजीक जीवनात वावरतांना अनिलभाऊ यांनी आपल्या कर्तृत्वाची अमीट छाप पाडली आहे. केमिस्ट क्षेत्रात तर त्यांनी पाऊल ठेवल्यानंतर संघटनेच्या राज्य सचिव पदापर्यंत उच्च शिखर गाठले आहे. एवढेच नव्हेतर केमिस्ट बांधवांनी त्यांना केमिस्ट कोहिनूर पदवी बहाल करून सन्मानित केले आहे. कोरोना काळात केमिस्ट बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी तसेच समाजातील अनेक घटकांना वैद्यकीय उपचार परवडत नसल्याचे पाहून रुग्णांना वेळेवर औषधी पुरविण्यासाठी अहोरात्र घेतलेली मेहनत सुध्दा त्यांच्या परोपकाराची जाणीव करुन देते. संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविणे आदि सेवाभावी कार्यामुळे त्यांनी समाजात आपला वेगळाच ठसा उमटविला आहे. अनिलभाऊ यांच्या एकंदरीत समाज कार्याचा व कर्तृत्वाचा आढावा घेतला तर वाढता आलेख दिसून येईलच. या कार्याची पावती म्हणून खामगाव प्रेस क्लबच्या वतीने 6 जानेवारी 2024 रोजी पत्रकारदिनी अनिलभाऊ नावंदर यांना प्रतिष्ठेचा व मानाचा खामगाव रत्न पुरस्कार देऊन पत्रकार बांधवांनी सन्मानित केले आहे. हे उल्लेखनीय. आज वाढदिवसानिमित्त अनिलभाऊंना मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा! त्यांचे हातून सदोदित सेवाभावी कार्य घडो, यासाठी त्यांना बळ मिळो व दीर्घायुष्य लाभो, हीच आई भवानी चरणी प्रार्थना !
- गणेश भेरडे


Post a Comment