प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या
खामगाव (जनोपचार न्यूज नेटवर्क ) - प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या झाल्याचा खळबळजनक प्रकार मलकपुर तालुक्यातील बेलाड येथे उघडकीस आला आहे. २१ वर्षीय तरुणाने २७ वर्षीय तरुणाला दारू पाजून त्याचा खून केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. प्रवीण अजाबराव संबारे (२७) रा. बेलाड, ता. मलकापूर असे मृतक तरुणाचे नाव आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण संबारे हा दारू पिऊन बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती त्याच्या एका मित्राने प्रवीणच्या भावाला फोनवरून दिली. मिळालेल्या माहितीवरून प्रवीणचा भाऊ सचिन हा मलकापुरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या पाठीमागे पोहोचला. तिथे त्याला प्रवीण बेशुद्ध अवस्थेत दिसला. प्रवीणला उपचारासाठी मलकापूर येथील खाजगी रुग्णालयात हलवले, त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून प्रवीणला मृत घोषित केले. दरम्यान काल, गुरुवारी दुपारी प्रवीणवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान अंत्यसंस्कार आटोपल्यानंतर प्रवीणचा भाऊ सचिन याने आदल्या दिवशी रात्री आलेल्या फोनचे कॉल रेकॉर्डिंग वारंवार ऐकले. प्रवीण सोबत आदल्या दिवशी रात्री जो मित्र होता ज्याने फोन करून प्रवीण बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती दिली होती. त्यावरच प्रवीणच्या कुटुंबीयांचा संशय बळावला. प्रवीणच्या कुटुंबीयांनी लगेच पोलीस ठाणे गाठत प्रवीणचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला. यावरून पोलिसांनी वैभव गोपाळ सोनार (२१) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. आधी उडवा-उडवीचे उत्तरे देणाऱ्या वैभवने रुमालाने नाक आणि तोंड दाबून प्रवीणची हत्या केल्याची कबुली दिली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वैभवने प्रवीणचा खून करण्याचे कारण सांगितले. मृतक प्रवीण हा वैभवच्या बहिणीवर प्रेम करत होता. त्यामुळे वैभवचे कुटुंब देखील त्रस्त होते. प्रवीणच्या या त्रासाला कंटाळूनच त्याचा काटा काढायचा विचार वैभवच्या डोक्यात होता, त्यातूनच हे हत्याकांड झाल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी वैभव गोपाळ सोनार रा. तरोडा, ता. मुक्ताईनगर याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Post a Comment