कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्या दोघांना कारावासाची शिक्षा - न्या. सरोज गाडेकर माने यांचा निकाल
हिंगोली : जनोपचार न्यूज नेटवर्क - ढाब्याची लाईट बंद केल्याच्या रागातून शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी दोन आरोपींना न्या. एस एन गाडेकर माने यांच्या न्यायालयाने प्रत्येकी दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
अजिंक्य किशोर चिमूरकर यांनी एका ढाव्याची वीज बंद केली होती. याच रागातून आरोपी शेख इक्बाल ऊर्फ बाली शेख हमीद आणि कमलेश ऊर्फ गुड्डू घनश्याम शर्मा (दोघे रा. कळमनुरी) यांनी अजिंक्य चिमूरकर यांच्याशी वाद घातला. 'तुम्ही थकीत वीजबिल का वसूल करता आणि माझ्या ढाव्याची वीज का बंद केली?' असे म्हणत चिमूरकर यांना मारहाण केली. शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच, साक्षीदार करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला, अशी तक्रार अजिंक्य चिमूरकर यांनी कळमनुरी पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार, कळमनुरी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस उपनिरीक्षक एस.एस. घेवारे यांनी या प्रकरणाचा तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. जिल्हा न्यायाधीश-१ एस.एम. माने-गाडेकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील एन.एस. मुटकुळे यांनी सात साक्षीदारांची तपासणी केली आणि अंतिम युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, जिल्हा न्यायाधीश-१ एस.एम. माने-गाडेकर यांनी शेख इक्बाल ऊर्फ बाली शेख हमीद आणि कमलेश ऊर्फ गुड्डू घनश्याम शर्मा या दोघांनाही भादंवि कलम ३५३ अंतर्गत प्रत्येकी एक वर्षाचा सश्रम कारावास आणि १५,००० रुपये दंड तसेच, भादंवि कलम ३३२ अंतर्गत प्रत्येकी एक वर्षाचा सश्रम कारावास आणि १५,००० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
जिल्हा सरकारी वकील एन.एस. मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारी वकील एस.डी. कुटे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. त्यांना सविता एस. देशमुख यांनी सहकार्य केले. कोर्ट पैरवीसाठी पोलिस कर्मचारी संजय बलखंडे यांनी सहकार्य केले.

Post a Comment