कृष्णा फाउंडेशनच्या रक्तदानातून सामाजिक कार्याचा शुभारंभ
भालेगाव बाजार (जनोपचार न्यूज नेटवर्क) :जागतिक रक्तदान दिन (१ ऑक्टोबर) या औचित्याने कृष्णा फाउंडेशन, कुंभेफळ या नव्या संस्थेच्या सामाजिक कार्याची सुरुवात रक्तदान उपक्रमाने करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष धनंजय संजय गोतमारे व सदस्य आकाश अनिल हिवाळे यांनी स्वतः रक्तदान करून समाजातील सर्व नागरिकांना रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.
"रक्तदान ही समाजाला दिलेली जीवनदानाची खरी देणगी आहे. प्रत्येक निरोगी व्यक्तीने वर्षातून दोन वेळा रक्तदान करणे गरजेचे आहे. अपघातग्रस्त रुग्ण, थॅलेसेमियाग्रस्त मुले, गंभीर आजारांनी त्रस्त रुग्ण तसेच प्रसूतीदरम्यान अडचणीत आलेल्या मातांना रक्ताची आवश्यकता भासते. अशा वेळी रक्तदात्याचे एक पिशवी रक्त कोणाचातरी जीव वाचवते. त्यामुळे रक्तदान ही खरी मानवसेवा आहे आणि यामुळे समाजातील मानवतेचे बंध अधिक दृढ होतात," असे गोतमारे यांनी सांगितले.
"रक्तपेढ्यांमध्ये नेहमीच विविध रक्तगटांची कमतरता भासते. विशेषतः दुर्मिळ रक्तगटांच्या उपलब्धतेत अडचणी येतात. अशा वेळी युवक-युवतींनी मोठ्या संख्येने पुढे येऊन रक्तदान केले पाहिजे. रक्तदानामुळे अनेक गरजूंचे प्राण वाचतात. ही केवळ सेवा नाही तर प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. त्यामुळे नियमित रक्तदान करून समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडावे," असे आवाहन त्यांनी केले.
रक्तदानावेळी बुलडाणा येथील रक्तपेढीचे रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. शुभम चांडकं डॉ स्लोका देशपांडे, पर्यवेक्षक विष्णू मुंडे, तंत्रज्ञ प्रीती सालोख, शितल इंगळे, तसेच अधिपरिचारिका सुनिता गवळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कैलास झिने, वरिष्ठ सहाय्यक सोमनाथ माठे, महेश राखे, वरिष्ठ लिपिक राजू काटोले, प्रमोद भोपळे व बीव्हीजी कर्मचारी गजानन भोरखडे तसेच महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय, बुलडाणा चे प्राचार्य डॉ. अविनाश गेडाम ल्यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. रक्तदात्यांचे व कृष्णा फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.
सामाजिक जनजागृतीचे आश्वासन
कृष्णा फाउंडेशनच्या या रक्तदान उपक्रमामुळे गाव व परिसरात रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करत अध्यक्ष धनंजय गोतमारे व सदस्य आकाश हिवाळे या दोघांनीही समाजातील सर्व नागरिकांना स्वैच्छिक रक्तदानाची प्रतिज्ञा घेऊन रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

Post a Comment