आपण याला ओळखता का ? हा आहे मतदारांचा ब्रम्हास्त्र !!
जसा ग्राहक बाजारात राजा किंवा देव मानला जातो तसाच मतदार निवडणुकीत राजा मानला जातो ! मतदार आणि राजा, विश्वास बसत नाही न, पण याला कारणीभूत मतदारच आहे.श्री टी. एन. सेशन (दिवंगत आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त) यांनी कायद्याने संपूर्ण निवडणुक प्रक्रिया स्वच्छ करण्यासाठी मोलाची कामगिरी केली. पण दुसरी आणि अत्यंत महत्वाची बाजू म्हणजे मतदार अश्या स्वच्छता मोहीम प्रती उदासीनता दाखवीत आहे. मतदारांनी मनावर घेतले तर निरंकुश जनसेवकांना (तथाकथित) वेळीच नियंत्रित करता येऊ शकते.
भारतीय संविधान मधे अनुछेद ३२६ अंतर्गत मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि मतदान करणे एक पवित्र कर्तव्य मानल्या जाते. निवडणुकीत उमेदवार योग्य असो किंवा नसो, मतदान करणे आपले कर्तव्य जाणून मतदार मतदानाचा हक्क बजावितो आणि बहुधा नको ते उमेदवार निवडून येतात. "दगडा पेक्षा, वीट मउ" या उक्ती प्रमाणे जे उमेदवार निवडणुकीचा रिंगणात असतात त्यातूनच, अधिक योग्य चा विचार करून मतदान करण्याचा मानस असतो. नंतर लक्षात येते कि, ज्यास निवडून दिले तो ही जनतेचे प्रश्न, समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष करतो. अश्या वेळी जनतेने काय करावे ?
पण आता परिस्थिती बदललेली आहे. मतदार लाचार नाही. तो सार्वभौम आहेत. मा. सर्वोच्च न्यायालयाने PUCL vs. Union of India या प्रकरणात दिलेल्या निर्णयाचा अनुषंगाने भारतीय निवडणूक आयोगाने २०१३ मधे ई.व्ही.एम. मधे एक बटन जोडला, तो म्हणजे NOTA (None of the Above) म्हणजेच "वरील पैकी कोणताही नाही".
ग्रीस, युक्रेन, स्पेन, कोलंबिया, रशिया, अमेरिका ई. देशांमध्ये देखील NOTA पर्याय पूर्वी पासूनच उपलब्ध आहे भारतात प्रथम 2013 मध्ये छत्तीसगड, मिझोरम, राजस्थान, मध्यप्रदेश, दिल्ली या ठिकाणी झालेल्या निवडणुकीत NOTA वापरण्यात आला. NOTA ला मतदान करून सुद्धा मतदानाचा हक्क बजाविता येते. NOTA निवडल्यास मतदार "वरीलपैकी कोणताही उमेदवार पसंत नाही" असा संदेश निवडणूक आयोगाला आणि पर्यायाने राजकीय पक्ष आणि उमेदवाराला देतो. NOTA मधे सुद्धा मतदाराची गुप्तता सुरक्षित राहते आणि मत नकारण्याचा अधिकार मिळतो. NOTA हा पर्याय मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणि लोकशाही वाढवण्यासाठी महत्त्वाचा आहे. यामुळे मतदारांना निर्बंध न ठेवता खुलेपणाने निषेध व्यक्त करता येतो.
म्हणून आता मतदान साठी जातांना स्वतःला एक अत्यंत साधा, सरळ आणि सोपा प्रश्न विचारावा !! तो म्हणजे निवडणुकीतील उमेदवार, राजकीय पक्ष नागरिकांचा हितासाठी किती संवेदनशील आहे ? जनतेला प्रत्येक २४ तासात पिण्याचे स्वच्छ पाणी मिळते का ? स्वच्छता, पथदिवे, आरोग्य, शिक्षा, पर्यावरण, रस्ते, नाल्या ई. पायाभूत सुविधांकडे पुरेसा लक्ष दिल्या जातो काय स्थानिक प्रशासन नागरिकांवर भरमसाठ करांचा बोझा टाकत आहे का ? में मोठ्या नेत्यांना जनतेशी काही घेणे देणे आहे कि ते नुसते हवेतच राहतात ? असेच दैनंदिन जीवनातले कित्येक प्रश्न असतील जे नागरिकांना त्रासदायक ठरतात. पण तथाकथित जनसेवकांना २४ x ७ राजकारण करण्याशिवाय दुसरे काहीही दिसत नाही. नेते कोठून कोठे पोहचले पण जनतेचे मात्र हाल होत आहेत. थोडक्यात "नेता मस्त, नागरिक त्रस्त".
अश्या उमेदवार व "झेलम" लोकांना धडा शिकवण्यासाठी आहे ब्रम्हास्त्र म्हणजे "NOTA" "वरीलपैकी कोणताही उमेदवार पसंत नाही". सर्व उमेदवार, राजकीय पक्ष आप-आपला प्रचार करीत आहे, लाखों रुपयांची उधळपट्टी सुरु आहे आणि निवडून आले कि, कशी वसुली होते हे सर्वविदित आहे. NOTA बेचारा एकटाच उमेदवार त्याचा प्रचार आणि प्रसार कोणी करायचा ? नागरिकांना NOTA चा अधिकार आहे, या बाबत जागरूकता कोणी करायची ? म्हणून हा लेख.
सर्व जागृक नागरिकांना विनंती कि आपापल्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर NOTA बाबतीत नागरिकांना शिक्षित करावे, त्यावर चर्चा करावी, आपल्या उमेदवारांचे विश्लेषण करावे आणि मगच मतदान कोणाला कि कोणालाही नाही ठरवावे. आता निवडणुकीत मत मागण्यासाठी दिवसरात्र एक करणारे उमेदवारांपैकी बहुतेक निवडून आल्यावर ५ वर्ष तोंड ही दाखवणार नाही, त्यांना शिकवण देणे गरजेचे आहे.
NOTA चा ताकदीवर बोलायचे तर असे कि, हा वाघ तर आहे, पण विना दातांचा. तरी वाघ शेवटी वाघच. जेव्हा याला कायद्याचे दात मिळतील तेव्हा लोकशाही अधिक बळकट होईल. तेव्हा NOTA ला सर्वाधिक मते मिळाली तर त्या पेक्षा कमी मते मिळणाऱ्या उमेद्वाराला पुन्हा निवडणुकीत उभे राहता येणार नाही. समाजात संदेश जाणार कि, मतदार सुजाण आहे, अलत्या-भलत्याला निवडून देत नाही. अयोग्य उमेदवार सुद्धा निवडणुकीत उभे राहण्यापूर्वी १०० वेळा विचार करतील कि, निवडून आल्यानंतर निट कर्तव्य पार पडली नाही, तर मतदार नोटा बटन दाबून बाहेर फेकतील. राजकीय पक्ष सुद्धा स्वच्छ प्रतिमा असलेले, नागरिकांचा समस्या सोडवण्यासाठी तत्पर असलेले उमेद्वार देण्यास बाध्य होतील.
तर, चला मतदान करू या, उज्वल भविष्यासाठी, नागरी सोयी सुविधांसाठी, लोकशाही टिकविण्यासाठी उमेदवार योग्य असेल त्याला आणि कोणीच योग्य नसेल तर ब्राह्मास्त्र चा वापर म्हणजेच NOTA
अॅड. एस. बी. पुरोहित
९४२२८८१५८० पुरोहित असोसियएटस
श्रीहरि, २३ अभंग कॉलोनी, नांदुरा रोड, खामगांव


Post a Comment