नवीन आधार केंद्र वाटप प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात.,UIDAI च्या नियमांची पायमल्ली, वरिष्ठांचे दुर्लक्ष...!
खामगाव - जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा अंतर्गत येत असलेल्या सेतू व महा आयटी विभागाकडून नवीन आधार केंद्र वाटप करणे संदर्भात ऑगस्ट 2025 मध्ये एका जाहिरातीद्वारे सेतू चालकांकडून अर्ज मागविण्यात आले होते .त्यानुसार महसूल मंडळ निहाय रिक्त असलेल्या नवीन आधार नोंदणी केंद्रासाठी सेतू चालकांनी अर्ज सादर केलेले आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी बुलढाणा यांचे अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या निवड समितीने अर्जांची छाननी करून दि.१०/०९/२०२५ रोजी अंतिम निवड यादी अधिकृतरित्या पोर्टलवर जाहीर केली आहे. मात्र सदर निवड प्रक्रिया राबवत असताना पात्र यादीमधील अनेक सेतू चालकांचे आधार सुपरवायझर प्रमाणपत्र कालबाह्य असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जाहिरात प्रकाशित झाल्यापासूनच या निवड प्रक्रियेत अनेक नियमांची पायमल्ली झाल्याचे दिसून येत आहे .नवीन आधार केंद्र स्थापन प्रक्रियेच्या जाहिरातीमध्ये किंवा मार्गदर्शक तत्वांमध्ये निवड यादीवर आक्षेप नोंदवण्यासाठी विशिष्ट वेळापत्रक किंवा कालमर्यादा नमूद नसणे, कालबाह्य आधार सुपरवायझर प्रमाणपत्र स्वीकारणे , निवड यादी प्रकाशित झाल्यानंतर निकष ठरवणे, सेतू केंद्र चालक व संबंधित अधिकारी यांच्यातील समन्वयाचा अभावामुळे प्रक्रिये बाबत संभ्रम निर्माण होणे आदी बाबींमुळे आधार केंद्र वाटप प्रक्रिया पारदर्शक होत नसल्याचा आरोप होत आहे.*काय आहे तज्ञांचे मत?* Uidai आणि प्रमाणपत्र जारी करणाऱ्या NSEIT यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार आधार सुपरवायझर प्रमाणपत्राची मुदत तीन वर्षासाठी वैध असते. Uidai चे आधार नोंदणी व अपडेट सॉफ्टवेअर केवळ आणि सक्रिय क्रीडेन्शिअल असलेल्या ऑपरेटर किंवा सुपरवायझरलाच काम करण्याची परवानगी देते. सॉफ्टवेअर मध्ये कालबाह्य प्रमाणपत्रावर आधारित क्रीडेन्शिअल स्वीकारलेच जात नाही. अशावेळी निवड समितीने कालबाह्य झालेल्या प्रमाणपत्र धारकांना त्यांचे अर्ज त्रुटीत काढून आधार सुपरवायझर प्रमाणपत्राचे नूतनीकरण करण्याचे आदेश देणे उचित ठरेल. महा आयटी विभागात चौकशी केली असता अर्जदारांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्याचा सल्ला दिला जातो. विशेष म्हणजे संबंधित प्रमुखांना या घडामोडींबद्दल कोणतेही पूर्वकल्पना किंवा अधिकृत माहिती नसल्याचे समोर आले आहे. निवड समितीने जे अर्ज पात्र केले आहेत त्यांच्या अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास त्या त्रुटीची माहिती न देता , त्रुटी पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून न देता त्यांना दुजाभावाची वागणूक देऊन आपले अर्ज रद्द होऊ शकतात अशी त्यांच्या मनात भीती निर्माण केली जात आहे. ज्यांची निवड झालेली नाही अशा काही विशिष्ट अर्जदारांना झुकते माप देण्यासाठी पात्र अर्जदारांचे अर्ज मुद्दामहून रद्द करण्यासाठी काही अधिकारी पुढाकार घेत असल्याची कुजबूज आहे. सेतू विभाग व महाआय टी विभागातील जबाबदार अधिकारी या निवड समितीमध्ये असल्याने त्यांनीच हा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा असताना त्रुटी दुरुस्तीची संधी न देताच अर्ज बाद करण्याचा घाट का घातल्या जात आहे ? हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. *विलंबानेच सिद्ध होत आहे प्रक्रियेमधील अपारदर्शकता.* गेल्या अडीच महिन्यापासून ही प्रक्रिया सुरू असून या प्रक्रियेमध्ये आधार किट वाटपासाठी निवड झालेल्या अर्जदारांना संबंधित कार्यालयाकडून दुजाभावाची वागणूक मिळत असून ज्यांची आधारकीट वाटपासाठी निवड झालेली नाही असे अर्जदार संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून चुकीचा मार्ग अवलंबून या प्रक्रियेत अडथळा निर्माण करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सुद्धा या प्रक्रियेला विलंब लागत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निवड समितीने समन्वयाची भूमिका घेऊन ४३ केंद्राचालकांना नवीन आधार किट वाटप एकत्रित करावी. पात्र अर्जदार यांना त्रुटींची संधी देऊन न्याय देण्याचे काम करावे. अशी सर्वांना अपेक्षा आहे.

Post a Comment