विज्ञानवादी दृष्टिकोनातून साहित्य निर्माण करावे -श्री. फ. मु. शिंदे
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव - साहित्यिकांनी विज्ञानवादी दृष्टीकोनातून साहित्य निर्माण करून समाजाभिमुख असे लेखन करावे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्री. फ. मु शिंदे यांनी केले.
सहकार महर्षी स्व. भास्करराव शिंगणे कला महाविद्यालय खामगाव येथे आयोजित 'राज्यस्तरीय वैखरी पुरस्कार 2025' पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिनी वैखरी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रदान सोहळा साजरा करण्यात आला.
यावेळी विजेत्या स्पर्धकांच्या पुस्तकांची ग्रंथदिंडी संपूर्ण महाविद्यालय परिसरातून काढण्यात आली. त्यानंतर ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाच्या वतीने ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्री.फ. मु शिंदे, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक डॉ. सदानंद देशमुख ,संस्थेचे सचिव डॉ. सद्गुण देशमुख ,सहसचिव डॉ. निलीमा देशमुख, संस्थेचे उपाध्यक्ष दिलीपराव देशमुख प्रा. रंगनाथ पठारे, डॉ. राजन गवस, श्री. नितीन कोतापल्ले श्रीपाद भालचंद्र जोशी, प्राचार्य डॉ. संजय पाटील यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले.
राज्यस्तरीय वैखरी पुरस्काराचे मुख्य संयोजक प्रा. डॉ. सुनील पवार यांनी या पुरस्काराबाबतची आपली भूमिका विशद केली. त्यानंतर 'वैखरी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 2025' चे वितरण करण्यात आले. डॉ. राजन गवस यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मृती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रोख रक्कम 11 हजार रुपये, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
काव्य विभागामधून श्रीपाद भालचंद्र जोशी यांना 'त्यानंतर'या काव्यसंग्रहासाठी स्व. प्रभावती भास्करराव शिंगणे स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रोख रक्कम 11 हजार रुपये, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. कादंबरीसाठी श्री नितीन नागनाथ कोत्तापल्ले यांच्या 'गुरु'या कादंबरीस प्राचार्य स्व. गो. पू. देशमुख स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 11 हजार रुपये रोख रक्कम व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.तर डॉ. रंगनाथ पठारे यांना सहकार महर्षी स्व. भास्करराव शिंगणे स्मृती जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 11 हजार रुपये रोख रक्कम व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. तर संकीर्ण विभागामधून अजित सिंग चहल यांना स्व. शालिनी गो. देशमुख स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला 11 हजार रुपये रोख रक्कम व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
याप्रसंगी निवड समितीचे अध्यक्ष तथा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक डॉ. सदानंद देशमुख यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रमुख अतिथी श्री. फ. मु. शिंदे यांनी साहित्यिकांना राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण करणारे बुलढाणा जिल्ह्यातील हे एकमेव महाविद्यालय आहे असे प्रतिपादन केले. त्यांनी याप्रसंगी आपल्या 'आई' या कवितेचे बहारदार सादरीकरण करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. वैखरी राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळ्याचे अध्यक्ष संस्थेचे सचिव डॉ. सद्गुण देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून साहित्यिकांच्या साहित्यकृतीची दखल घेऊन त्यांना साहित्य निर्मितीस प्रेरणा मिळावी या दृष्टिकोनातून राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करावा हा संस्थेचा मानस होता त्याची आज या निमित्ताने फलश्रुती झाली. याबद्दल आनंद व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पाटील, संचालन प्रा. डॉ. प्रमोद चव्हाण तर आभार प्रा. डॉ. हर्षा ढाले यांनी मानले. यावेळी खामगाव नगरीतील विविध साहित्यिक, प्राचार्य, साहित्यप्रेमी मंडळी, तसेच विविध महाविद्यालयातील प्राध्यापक,शिक्षक , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


إرسال تعليق