श्री रामनवमी व रमजान ईद सणानिमित्त स्वस्त धान्याचा पुरवठा व्यवस्थित करावा
- अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे निवेदन
खामगाव प्रतिनिधी:श्री रामनवमी व रमजान ईद या दोन्ही पवित्र सणानिमित्त स्वस्त धान्य दुकानात अन्नाचा तुटवडा असून या काळात स्वस्त धान्याचा पुरवठा व्यवस्थित करावा अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पाठविले आहे. सदर निवेदनात नमूद आहे की,हिंदु व मुस्लीम बांधवांचे पवित्र सण रामनवमी व रमजान ईद मार्च महिन्यात येत आहेत. त्या अनुषंगाने स्वस्त धान्य दुकानात अद्याप पावेतो पुरेसा धान्याचा पुरवठा शिधा पत्रिका धारकांना झालेला नाही. ७ मार्च २०२६ पावेतो मार्च महिन्याचे कोणत्याही प्रकारचे शिधा वाटपाचे वितरण सुरु झालेले नाही. तरी त्वरीत धान्य पुरवठा करण्यात यावा जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही व त्यांचे सण आनंदाने साजरे होतील.
सरकारकडून मिळणारी धान्याची मदत ही गोरगरीबांना आपल्या संसारासाठी फार महत्वाची आहे. पूर्वी निवडणूक काळात गोरगरीबांना शिधा वाटप किटचे वाटप करण्यात आले होते. परंतू आता कोणत्याही प्रकारचे किट वाटप होत नाही त्यामुळे "गरज सरो वैद्य मरो" या उक्तीचा प्रत्यय शिधापत्रिका धारकांना येत आहे.
म्हणून त्वरीत आदेश काढून नागरिकांना तातडीने धान्याचा पुरवठा करावा असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांनी निवेदनात नमूद केले आहे. निवेदनाच्या प्रति देवेन्द्र फडवणीस मुख्यमंत्री,श्रीमती सुमित्राताई अजितदादा पवार उपमुख्यमंत्री,एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, मकरंद जाधव पालकमंत्री,जिल्हाधिकारी बुलडाणा,तहसीलदार, खामगांव,
डॉ.बबनराव तायवाडे राष्ट्रीय अध्यक्ष, ओबीसी महासंघ नागपूर यांना पाठविण्यात आल्या आहेत.

إرسال تعليق