राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ. तौशिफ शेख यांची नियुक्ती
राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ. तौशिफ शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय समाज पक्ष चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली असून, पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांच्या संमतीने अधिकृत पत्राद्वारे ही घोषणा करण्यात आली आहे. डॉ. शेख हे अनेक वर्षांपासून पक्ष संघटनेत सक्रिय राहून विविध जबाबदाऱ्या पार पाडत आहेत.
डॉ. तौशिफ शेख यांच्या कार्यक्षमतेचा, विचारक्षमतेचा आणि संघटन कौशल्याचा विचार करून त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांनी पक्षाच्या विविध पदांवर काम करताना सातत्याने निष्ठा व प्रामाणिकपणा जपला असून, त्यांच्या निवडीमुळे पश्चिम विदर्भातील कार्यकर्त्यांना मोठे बळ मिळाले आहे.
निवडीनंतर प्रतिक्रिया देताना डॉ. तौशिफ शेख यांनी सांगितले की, पक्षश्रेष्ठी माधवराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली विदर्भातील शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी पक्षाच्या वतीने प्रभावी लढा उभारला जाईल. तसेच विदर्भात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात येणार असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाचे उमेदवार उभे करून ताकदीने निवडणूक लढविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Post a Comment