‘नारी शक्ती’च्या मंचावर अदितीची झेप; पंतप्रधानांशी संवादाची सुवर्णसंधी!
खामगाव : देशाच्या नव्या पिढीला नेतृत्वाची दिशा देणाऱ्या ‘मेरा युवा भारत’ (My Bharat) या उपक्रमांतर्गत आयोजित महिला युवा संसद (My Bharat Budget Quest 2026) मध्ये खामगाव शहरातील अदिती रितेश खेतान हिला सहभागी होण्याचा मान मिळाला आहे. “नारी शक्ती : विकसित भारताची आवाज” या प्रभावी विषयावर होणाऱ्या या विशेष युवा संसदेत तिची निवड होणे ही कुटुंबासाठी आणि शहरासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून देशभरातील तरुणींना आपले विचार मांडण्याची, नेतृत्वगुण विकसित करण्याची आणि राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग घेण्याची संधी मिळत आहे. अदितीच्या निवडीमुळे तिच्या कर्तृत्वाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे.
विशेष म्हणजे, या युवा संसदेत सहभागी झालेल्या निवडक प्रतिनिधींना देशाचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याशी संवाद साधण्याची सुवर्णसंधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अदितीसाठी हा अनुभव आयुष्यभरासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
अदितीच्या या यशामुळे कुटुंबासह परिसरात आनंदाचे वातावरण असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिच्या यशातून ‘नारी शक्ती’चा आत्मविश्वास आणि विकसित भारताचे स्वप्न अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

إرسال تعليق