उद्या खामगावात छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा

नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे 


खामगाव  जनोपचार न्यूज नेटवर्क  :स्वराज्यवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा समिती, खामगाव यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वराज्यवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य-दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. १४ मे २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील स्वराज्यवीर छत्रपती संभाजी महाराज प्रवेशद्वार येथून शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे.

अवघ्या ३२ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या अफाट बुद्धिमत्ता, युद्धनीती, शौर्य आणि शस्त्रकौशल्याच्या बळावर संपूर्ण विश्वाला प्रेरणा दिली. त्यांच्या पराक्रमाचा आणि राष्ट्रनिष्ठेचा आदर्श युवकांसाठी प्रेरणादायी असून, त्यांच्या चरित्रातून देशप्रेम, स्वाभिमान आणि संघर्षाची शिकवण मिळते, असे मत आयोजकांनी व्यक्त केले.

यंदाच्या शोभायात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे साहित्यिक शंभूराजे चित्ररथ, भक्ती-शक्तीचा जिवंत देखावा, तसेच शिवकालीन लाठी-काठी प्रात्यक्षिके असणार आहेत. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आणि भगव्या वातावरणात ही शोभायात्रा उत्साहात पार पडणार आहे.

या भव्य-दिव्य शोभायात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन स्वराज्यवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा समिती च्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم