आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त क्रिकेट स्पर्धेचा उत्साह; जय जगदंबा मंडळ प्रथम विजेता

खामगाव येथील सतीफैल परिसरात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या "श्री महर्षी वाल्मिकी कालिंका जगदंबा उत्सव मंडळ क्रिकेट चषक 2026" स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (दि. 21 जून 2026) उत्साहात संपन्न झाला. दि. 19 जूनपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत एकूण 16 संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेची सुरुवात राष्ट्रगीताला मानाचा सन्मान देऊन करण्यात आली.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यांनंतर जय जगदंबा मंडळ, सतीफैल या संघाने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळविले. प्रथम पारितोषिक म्हणून ₹7,777 रोख रक्कम देण्यात आली. या पारितोषिकाचे प्रायोजक संजुभाऊ तंबोले (अ. भा. स. म. युनियन महाराष्ट्र युवा प्रकोष्ठ प्रदेश अध्यक्ष) होते. तर यजमान संघ श्री महर्षी वाल्मिकी कालिंका जगदंबा मंडळ, सतीफैल याने द्वितीय क्रमांक मिळविला. द्वितीय पारितोषिक ₹5,555 चे प्रायोजक मनोजसेठ चिंडाले होते.

स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंनाही विशेष सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. राहुल बागल यांना बेस्ट बॅट्समन, प्रतिक मिश्रा यांना मॅन ऑफ द सिरीज तर गौरव सुसगोहर यांना बेस्ट बॉलर पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच शांतीलालजी सुसगोहर यांच्या प्रायोजकत्वातून सहभागी सर्व 16 संघांतील खेळाडूंना सन्मानचिन्ह देण्यात आले.

यावेळी मंडळाच्या वतीने सर्व खेळाडू, आयोजक, प्रायोजक व उपस्थित नागरिकांचे आभार मानण्यात आले. क्रीडाभावना, शिस्त, एकता आणि देशभक्तीची भावना वृद्धिंगत करणारा हा उपक्रम ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post