टिव्ही अँड डिजिटल मीडिया जर्नालिस्ट असोसिएशनच्या खामगाव तालुकाध्यक्षपदी संतोष करे

खामगाव (जनोपचार):पत्रकारांच्या हितासाठी आणि हक्कासाठी सदैव संघर्ष करणाऱ्या 'टिव्ही अँड डिजिटल मीडिया जर्नालिस्ट असोसिएशन'च्या खामगाव तालुकाध्यक्षपदी येथील सक्रिय पत्रकार संतोष करे यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या संघटनेच्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.
        टिव्ही अँड डिजिटल मीडिया जर्नालिस्ट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष राहुल पहुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये संघटनात्मक बांधणी व तालुकाध्यक्ष नियुक्त करण्याचा प्रस्ताव जिल्हाध्यक्ष फहीम देशमुख यांनी बैठकीत मांडला. या विषयाला उपस्थितांनी तात्काळ मान्यता दिली. त्यानुसार खामगाव येथील पत्रकार संतोष करे यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब झाले. यानंतर जिल्हाध्यक्ष फहीम देशमुख यांनी संतोष करे यांना अधिकृतपणे तालुकाध्यक्ष म्हणून घोषित केले. नियुक्तीची घोषणा झाल्यानंतर बैठकीत उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नवनियुक्त तालुकाध्यक्ष संतोष करे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना नवनियुक्त तालुकाध्यक्ष संतोष करे यांनी सांगितले की, "संघटनेला अधिक बळकट करण्यासाठी तालुक्यात विविध सामाजिक व व्यावसायिक उपक्रम राबवले जातील. ग्रामीण व शहरी भागातील पत्रकारांच्या अडीअडचणी आणि समस्या समजून घेऊन, त्यांच्या हक्कासाठी ही संघटना सदैव तत्पर राहील व त्यासाठी आपण सदैव लढा देऊ." 

या प्रसंगी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष अमोल गावंडे आणि जिल्हा सचिव प्रफुल्ल खंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी नवनियुक्त अध्यक्षांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या बैठकीला खामगाव परिसरातील अनेक पत्रकार आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post