खामगाव : फर्मा घसरल्याने मजुराचा मृत्यू; विहिरीच्या खोदकामावरून चर्चांना उधाण: जबाबदार कोण??
खामगाव तालुक्यातील सजनपुरी शिवारातील स्व भाऊसाहेब फुंडकर खासगी बाजार समितीच्या मागील नाल्यात सुरू असलेल्या विहिरीच्या खोदकामादरम्यान फर्म (शटरिंग) घसरल्याने भगवान महादेव दांदडे (वय ३२) या मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून विहिरीच्या बांधकामासंदर्भात विविध चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान याला जबाबदार कोण असा सवालही उपस्थित होऊ लागला आहे. संबंधित विहिरीचे काम कोणाच्या परवानगीने सुरू होते, तसेच खोदकामासाठी आवश्यक मंजुरी घेण्यात आली होती का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
![]() |
| जाहिरात |
मिळालेल्या माहितीनुसार, भगवान दांदडे हे गेल्या काही दिवसांपासून विहिरीच्या बांधकामावर मजूर म्हणून कार्यरत होते. १६ जून रोजी काम सुरू असताना फर्म घसरून ते विहिरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी व प्रशासनाने मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेह बाहेर काढत पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, या प्रकरणात कोणावरही अद्याप गुन्हा दाखल झालेला नसून घटनेची सखोल चौकशी सुरू असल्याचे समोर आले आहे. विहिरीच्या बांधकामासाठी आवश्यक परवानग्या, कामाची जबाबदारी आणि सुरक्षिततेचे नियम पाळले गेले होते का, याची चौकशी प्रशासनाकडून केली जाण्याची मागणी होत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.


Post a Comment