शेगाव, दि. 11 जून : शेगाव रेल्वे स्थानक परिसरात झोपलेल्या महिला प्रवाशाची पर्स व मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीला आरपीएफ ने अवघ्या काही तासांत अटक करण्यात आली. आरोपीकडून चोरीस गेलेला ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सौ. सुरेखा किशोर मेशरे (वय 38) या इतर प्रवाशांसह शेगाव दर्शनासाठी आल्या होत्या. रेल्वे स्थानक परिसरात झोपलेल्या असताना त्यांच्या जवळील पर्स अज्ञात चोरट्याने लंपास केली. पर्समध्ये सुमारे 13 हजार 500 रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन होता. घटनेची माहिती मिळताच एएसआय रंजन तेलंग यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका संशयित इसमाने रात्री 11.10 वाजताच्या सुमारास चोरी केल्याचे स्पष्ट दिसून आले. यानंतर जीआरपी शेगाव येथे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा क्र. 93/2026, कलम 303(2) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान आरोपीचा फोटो मुखबिरांकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार 11 जून रोजी पहाटे आरोपी रेल्वे स्थानक परिसरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर एएसआय रंजन तेलंग यांनी बुकिंग हॉल परिसरातून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव शरद भगवान शैरीसे (वय 35, रा. सैदपूर, ता. मूर्तिजापूर, जि. अकोला) असे सांगत चोरीची कबुली दिली. त्यानंतर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून आवश्यक कागदपत्रांसह त्याला पुढील कारवाईसाठी जीआरपी शेगाव यांच्या ताब्यात देण्यात आले. 

Post a Comment

Previous Post Next Post