सामान्य रुग्णालयातील समस्यांवर तातडीने तोडगा काढा; अन्यथा शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध प्रलंबित समस्या आणि रुग्णांना भेडसावणाऱ्या अडचणी तातडीने दूर करण्याची मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. रुग्णालयात त्वरित सोनोग्राफी सेवा सुरू करणे, त्यासाठी रेडिओलॉजिस्टची नियुक्ती करणे, वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपस्थित राहावेत, रुग्णांना उपचारासाठी विनाकारण बाहेर रेफर करण्याची पद्धत बंद करावी तसेच वॉर्डांमध्ये नियमित स्वच्छता राखावी, अशा प्रमुख मागण्या निवेदनात करण्यात आल्या.
याशिवाय डिलिव्हरी वॉर्डातील सेवेत सुधारणा, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी सन्मानाने वागणूक, सीटी स्कॅन सेवा कार्यान्वित करणे, एक्स-रे, वीज व जनरेटरची सुविधा सुरळीत ठेवण्याची मागणीही करण्यात आली. या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाप्रमुख ॲड. अमोल अंधारे यांनी दिला.

إرسال تعليق