खामगाव, दि. 9 (उमाका): शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ पारदर्शक, सुलभ व अखंडितपणे मिळावा, यासाठी तहसील पुरवठा विभागामार्फत सर्व शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी (e-KYC) व मोबाईल क्रमांक सीडिंगची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ज्या शिधापत्रिकाधारकांनी अद्याप ई-केवायसी अथवा मोबाईल क्रमांक सीडिंग केलेले नाही, तसेच जुलै 2026 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत नव्याने समाविष्ट झालेल्या लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या रास्त भाव धान्य दुकानात आवश्यक कागदपत्रांसह भेट देऊन ही प्रक्रिया 20 जुलै 2026 पूर्वी पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ई-केवायसी व मोबाईल क्रमांक सीडिंग पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ अधिक सुलभरीत्या मिळण्यास मदत होणार असून, योजनांबाबतच्या सूचना व माहिती वेळोवेळी मोबाईलवर प्राप्त होतील. तसेच लाभ वितरण प्रक्रियेत पारदर्शकता वाढून पात्र लाभार्थ्यांपर्यंत लाभ प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होईल.
जुलै 2026 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत 1,350 नव्या शिधापत्रिकांचा समावेश करण्यात आला असून, त्याद्वारे सुमारे 6,000 नव्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
तहसीलदार, खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षण अधिकारी रोशनी फुलझेले यांनी सर्व लाभार्थ्यांनी विहित मुदतीत ई-केवायसी व मोबाईल सीडिंगची प्रक्रिया पूर्ण करून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Post a Comment