खामगाव येथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव :अपर्णाताई यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन
खामगाव(नितेश मानकर) : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), बुलढाणा, कृषी विज्ञान केंद्र, जळगाव जामोद आणि रोटरी क्लब, खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी सभागृह, खामगाव येथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन खामगावच्या नगराध्यक्षा श्रीमती अपर्णाताई सागर फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, कृषी विज्ञान केंद्र, जळगाव जामोदचे प्रमुख डॉ. विकास जाधव, रोटरी क्लबचे समीर संचेती. विनायक सावजी, विनीत लोडाया, दीपक बुटे, नगरसेविका नीलिमाताई ढोरे, प्रमोद अग्रवाल, शर्मा यांच्यासह शेतकरी, महिला शेतकरी गट, आदिवासी बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना नगराध्यक्षा श्रीमती अपर्णाताई फुंडकर म्हणाल्या की, रानभाज्या म्हणजे आपल्या आजी-आजोबांच्या काळापासून चालत आलेला पारंपरिक आहाराचा ठेवा आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला ग्रामीण भागातील कुटुंबांमध्ये विविध प्रकारच्या रानभाज्या आवर्जून तयार केल्या जात असत. या भाज्यांमधून शरीराला आवश्यक असणारे विविध पोषक घटक मिळत असल्याने पारंपरिक आहारपद्धतीचे महत्त्व आजही कायम आहे. सध्याच्या फास्ट फूडच्या युगात नव्या पिढीला रानभाज्यांची ओळख करून देणे गरजेचे असून, प्रत्येक कुटुंबाने वर्षातून किमान एकदा तरी रानभाज्यांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. संतोष डाबरे यांनी प्रास्ताविकातून रानभाज्यांचे ग्रामीण अर्थव्यवस्था, आदिवासी शेतकरी आणि पारंपरिक शेतीशी असलेले नाते स्पष्ट केले. कृषी विभागाच्या वतीने दरवर्षी रानभाज्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण व आदिवासी भागातील पारंपरिक ज्ञान शहरी नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक असून, महिला भगिनींनी रानभाज्यांची योग्य पद्धतीने निवड, स्वच्छता व पाककृती शिकून आपल्या कुटुंबाच्या आहारात त्यांचा समावेश करावा, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. विकास जाधव यांनी रानभाज्यांचे आहारातील महत्त्व स्पष्ट करताना प्रत्येक रानभाजीची वैशिष्ट्ये व उपयोग समजून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. रानभाजी तयार करताना योग्य पद्धतीचा अवलंब करणे अत्यंत महत्त्वाचे असून, कोणतीही भाजी तिची योग्य ओळख पटवून आणि शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करूनच सेवन करावी, असे त्यांनी सांगितले.
रोटरी क्लबच्या वतीने समीर संचेती यांनी संस्थेमार्फत राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. रानभाज्यांचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने यावेळी विशेष पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. तसेच महोत्सवात सहभागी झालेल्या शेतकरी व आदिवासी बांधवांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
महोत्सवात महात्मा फुले शेतकरी गट, बळीराजा शेतकरी गट, अभिनव शेतकरी गट, श्री नवचैतन्य शेतकरी गट तसेच हेलगे, पारखेड, जनुना, सलाईबन, पिंपळगाव राजा आदी भागातील शेतकरी व आदिवासी बांधवांनी विविध प्रकारच्या रानभाज्यांचे प्रदर्शन मांडले. याशिवाय जिल्ह्यातील तसेच अकोला जिल्ह्यातून आलेल्या आदिवासी शेतकरी बांधवांनीही पारंपरिक रानभाज्या महोत्सवात आणल्या.
महिला शेतकरी बचत गटांच्या माध्यमातून रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेले विविध पारंपरिक खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले होते. खामगाव शहरातील नागरिकांनी या स्टॉलला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पारंपरिक रानभाज्यांचा व खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.
पारंपरिक आहार, स्थानिक जैवविविधता आणि शेतकरी-आदिवासी बांधवांच्या ज्ञानाचा वारसा जतन करण्यासोबतच रानभाज्यांना बाजारपेठ व व्यापक ओळख मिळवून देण्याच्या दृष्टीने हा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरला.

Post a Comment