श्री जटाशंकर डोंगरावर १० हजार सीड बॉल्सचा वर्षाव

वर्ल्ड फॉर नेचर, बुलढाणा व लॉयन्स क्लब खामगाव ‘संस्कृती’चा संयुक्त पर्यावरण संवर्धन उपक्रम

 खामगाव (प्रतिनिधी) :दुर्गम, उंच डोंगराळ भाग तसेच खोल दऱ्यांमध्ये पारंपरिक पद्धतीने वृक्षारोपण किंवा थेट बियांची पेरणी करणे कठीण असते. अशा भागात देशी वृक्षांची संख्या वाढवून निसर्गसंपदा समृद्ध करण्याच्या उद्देशाने वर्ल्ड फॉर नेचर, बुलढाणा आणि लॉयन्स क्लब ऑफ खामगाव ‘संस्कृती यांच्या संयुक्त विद्यमाने अभिनव ‘सीड बॉल बॉम्बिंग उपक्रम राबविण्यात आला.

श्रावण सोमवार, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी संग्रामपूर तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ श्री जटाशंकर येथील उंच डोंगरभाग तसेच खोल दऱ्यांच्या कडांवर सुमारे १० हजार सीड बॉल्सचा वर्षाव करण्यात आला. या उपक्रमामागील संकल्पना वर्ल्ड फॉर नेचरचे जिल्हाध्यक्ष व पक्षीप्रेमी संजय गुरव यांची असून, लॉयन्स क्लब खामगाव ‘संस्कृतीने या उपक्रमाला सक्रिय सहकार्य केले. शेण व मातीच्या मिश्रणातून तयार करण्यात आलेल्या सीड बॉल्समध्ये कडुनिंब, चिंच, सीताफळ, करंज, सिवण, काटेसावर, बांबू, शिंदोळी, बहावा, बेल, खिरणी, बाभूळ, रामकाठी, कांचन, सागरगोटा, महरुख व ग्रीन चाफा यांसारख्या विविध देशी वृक्षांच्या बियांचा समावेश करण्यात आला होता.



वनविभागाच्या सहकार्याने तसेच श्रावण सोमवारनिमित्त श्री जटाशंकर येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागातून हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. दुर्गम व उंच डोंगर उतारांवर तसेच खोल दऱ्यांच्या परिसरात सीड बॉल्स विखुरण्यात आले. संजय गुरव यांनी सीड बॉल तंत्रज्ञानाचे महत्त्व स्पष्ट करताना पारंपरिक वृक्षारोपणासोबतच नैसर्गिक पद्धतीने बियांची पेरणी करण्याची गरज व्यक्त केली. नागरिकांनी घरात खाल्लेल्या फळांच्या बिया जतन करून योग्य नैसर्गिक ठिकाणी टाकाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.



संग्रामपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) अजय बावणे यांनी वर्ल्ड फॉर नेचरच्या पर्यावरण संवर्धनाच्या कार्याचे कौतुक केले. प्रत्येक नागरिकाने वनसंवर्धनासाठी सहकार्य केल्यास परिसरातील हिरवी संपदा निश्चितच सुरक्षित व समृद्ध राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. MJF Ln. वीरेंद्र शाह, लॉयन्स क्लब खामगाव ‘संस्कृती, यांनी उपस्थितांना ‘सीड बॉल बॉम्बिंग उपक्रमाची संकल्पना व पर्यावरणीय महत्त्व समजावून सांगितले. तसेच अशा पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन केले.

या उपक्रमासाठी बियांचे संकलन, प्रक्रिया आणि सुमारे १० हजार सीड बॉल्स तयार करण्याचे काम तब्बल दोन आठवडे सुरू होते. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. मंगला गुरव, गणेश कोकाटे, संतोष डवले, संदेश गुरव, मनोज सुलोकर, राजेश शर्मा  यांनी अथक परिश्रम घेतले. या पर्यावरणपूरक उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सहकाऱ्यांचे, वनविभागाचे तसेच सहभागी नागरिकांचे मनःपूर्वक आभार अध्यक्ष पीएमजेएफ लॉ.नरेश चोपडा, सचिव लॉ.दिव्या अग्रवाल, कोषाध्यक्ष लॉ.डिंपल शाह  यांनी  मानले.     या पर्यावरणपूरक उपक्रमाची मीडिया कव्हरेज करून वृत्तपत्रामध्ये बातमी प्रसिद्ध करण्यासाठी MJF लॉ.राजकुमार गोयनका यांनी मोलाचे सहकार्य केले. 


Post a Comment

أحدث أقدم