लोकनेते भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे लोकार्पण व समाजाभिमुख उपक्रम
खामगाव : लोकनेते भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट रोजी खामगाव शहरात विविध विकासकामांचे लोकार्पण तसेच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. कामगार मंत्री ना. अॅड. आकाशदादा फुंडकर, नगराध्यक्षा सौ. अपर्णा सागर फुंडकर, सागरदादा फुंडकर तसेच वरिष्ठ भाजप पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ११ वाजता प्रभाग क्रमांक ३ मधील नगरसेविका सौ. अनिता डुबरे व नगरसेवक गौरव बोबडे यांच्या वतीने समर्थ नगर, डी.पी. रोड येथे वृक्षारोपण कार्यक्रम होणार आहे. दुपारी ३ वाजता खामगाव नगरपरिषद पं. दीनदयाल अंत्योदय लघु व्यावसायिक संकुलाचे लोकार्पण होणार असून, याठिकाणी व्यावसायिक बांधवांच्या वतीने विद्यार्थ्यांना लेटरबुकचे वितरण करण्यात येणार आहे. दुपारी ४ वाजता नटराज गार्डन व नाना-नानी पार्क येथील पाणपोईचे (शीतजल आर.ओ. वॉटर कूलर) लोकार्पण करण्यात येणार आहे.
सायंकाळी ५ वाजता प्रभाग क्रमांक २ मध्ये नगरसेविका नसीमबानो व शौकत खान यांच्या वतीने ५५० विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता बडे प्लॉट येथे नगरसेविका नूर सबा अंजुम व अ. रशीद यांच्या वतीने १५० विद्यार्थ्यांना लेटरबुकचे वितरण करण्यात येणार आहे.
सायंकाळी ७ वाजता गांधी चौक येथे वंदेमातरम् मंडळाच्या वतीने नवीन शीत शवपेटीसह मेडिकल एड साहित्यामध्ये १० फोल्डिंग बेड, १० व्हीलचेअर व १० वॉकरचे सेवापर्ण करण्यात येणार आहे. तसेच वंदेमातरम् मंडळाच्या वतीने वापरात असलेल्या दोन शीत शवपेट्यांचे जलंब नाका खामगाव व माटरगाव येथील सेवाभावी संस्थांना हस्तांतरण करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात नगरसेवक मंगेश झुंझे यांच्या वतीने दोन मूकबधिर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण करण्यात येणार आहे.
लोकनेते भाऊसाहेब फुंडकर यांच्या प्रेरणेने त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या विविध उपक्रमांमधून विकासकामांसोबतच सामाजिक बांधिलकी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांना हातभार लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या लोकार्पण सोहळ्यासह विविध सेवाभावी उपक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment