पदाचा गैरवापर करून अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याचा आरोप; ठाणेदारांना निलंबित करण्याची मागणी

पत्रकार ईश्वरसिंह ठाकूर यांच्यावरील कारवाईविरोधात एसडीओ व डीवायएसपींकडे निवेदन


खामगाव : पत्रकार ईश्वरसिंह ठाकूर यांच्याविरोधात तक्रारीची योग्य ती शहानिशा न करता अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप करीत खामगाव शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुरेंद्र आहेरकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी खामगाव शहरातील पत्रकार संघटना व पत्रकार बांधवांनी केली आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे निवेदन साद करण्यात आले.

निवेदनात नमूद केल्यानुसार, पत्रकार ईश्वरसिंह ठाकूर हे मागील अनेक वर्षांपासून पत्रकारिता करीत आहेत. दरम्यान, ९ सप्टेंबर रोजी युवा हिंदू प्रतिष्ठान महाराष्ट्र व मातृवंदन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रोहित सूरजमल पगारिया यांनी गुलजम्मा शाह यांच्याविरोधात विविध न्यायालयांमध्ये प्रकरणे प्रलंबित व निकाली लागल्याचा दावा करीत त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी (महसूल), खामगाव यांना दिले होते. या निवेदनाच्या सत्यप्रतीच्या आधारे ११ सप्टेंबर रोजी दैनिक भास्करमध्ये वृत्त प्रकाशित झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.



यानंतर गुलजम्मा शाह यांनी सदर वृत्त बदनामीकारक असल्याचा आरोप करीत १६ सप्टेंबर रोजी खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून पत्रकार ईश्वरसिंह ठाकूर यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीची पुरेशी शहानिशा न करता ही कारवाई करण्यात आल्याची ही  निवेदनात नमूद आहे

शासकीय अधिकारी किंवा प्रशासनाकडे एखाद्या व्यक्तीविरोधात निवेदन, तक्रार अथवा मागणी करण्यात आल्यानंतर त्याची माहिती समाजापर्यंत पोहोचविणे हे पत्रकारांचे काम असल्याचे पत्रकारांनी निवेदनातून स्पष्ट केले. संबंधित निवेदनाच्या आधारेच पत्रकार ईश्वरसिंह ठाकूर यांनी वृत्त प्रकाशित केले असल्याचा दावा करण्यात आला आहे.

तसेच, बदनामीचा आरोप असल्यास संबंधित वृत्तपत्राच्या संपादक अथवा प्रकाशकांना कायदेशीर नोटीस देऊन न्यायालयात दाद मागण्याची प्रक्रिया अवलंबणे अपेक्षित असल्याचे पत्रकारांचे म्हणणे आहे. या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर परिणाम होण्याची भीतीही निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, पत्रकारांच्या शिष्टमंडळाने उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी पत्रकारांनी पत्रकारांची मुस्कटदाबी होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर प्रदीप पाटील यांनी संबंधित ठाणेदारांना याबाबत समजपत्र देण्यात येईल तसेच झालेला प्रकार अनावधानाने झाला असावा, असे सांगितल्याचे पत्रकारांनी नमूद केले.

या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून ठाणेदार सुरेंद्र आहेरकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी तसेच पत्रकार ईश्वरसिंह ठाकूर यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला अदखलपात्र गुन्हा रद्द करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी खामगाव शहरातील विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم