एस.एस.डी.व्ही. इंग्लिश स्कूलमध्ये अमली पदार्थ जनजागृती कार्यक्रम


खामगाव : अमली पदार्थांचे वाढते जाळे, सोशल मीडियाद्वारे होणारी दिशाभूल आणि विद्यार्थ्यांना लक्ष्य करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी सजग राहणे गरजेचे असल्याचे मार्गदर्शन करण्यात आले. येथील S.S.D.V. English School मध्ये बुधवार, दि. २४ सप्टेंबर रोजी अमली पदार्थ जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अमली पदार्थ म्हणजे काय, व्यसन कसे जडते, अमली पदार्थांचे विविध प्रकार तसेच त्यांचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या अमली पदार्थ तस्करीच्या विविध घटनांचा संदर्भ देत, अशा प्रकरणांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग आढळल्यास त्यांचे शैक्षणिक व वैयक्तिक आयुष्य गंभीरपणे प्रभावित होऊ शकते, याची जाणीव करून देण्यात आली.

अमली पदार्थांची तस्करी, विक्री किंवा संशयास्पद हालचाली आढळून आल्यास तातडीने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या १९३३ या हेल्पलाईन क्रमांकावर माहिती द्यावी, तसेच व्यसनमुक्तीसाठी १४४४६ या राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाईनचा उपयोग करावा, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी अमली पदार्थांच्या अवैध व्यापारातून दहशतवादी संघटनांना आर्थिक पाठबळ मिळण्याची शक्यता असल्याने हा विषय केवळ कायदा व सुव्यवस्थेपुरता मर्यादित नसून राष्ट्रीय सुरक्षेशीही संबंधित असल्याचे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. त्याचबरोबर ऑनलाईन गेमिंग, सोशल मीडिया, फेक न्यूज, सायबर गुन्हे तसेच कट्टरतावादी प्रचाराच्या माध्यमातून होणारी दिशाभूल याबाबतही विद्यार्थ्यांना जागरूक करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता सोशल मीडिया व डिजिटल प्लॅटफॉर्मचा जबाबदारीने वापर करावा, संशयास्पद बाबी निदर्शनास आल्यास पालक, शिक्षक किंवा पोलिसांना माहिती द्यावी, असा संदेश यावेळी देण्यात आला. स्वतःबरोबरच कुटुंब आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी जागरूक नागरिक म्हणून भूमिका बजावण्याचे आवाहन करण्यात आले.

रेल्वे पोलीस प्रवाशांच्या सुरक्षिततेबरोबरच युवक व विद्यार्थ्यांना गुन्हेगारी, अमली पदार्थांचे व्यसन आणि कट्टरतेपासून दूर ठेवण्यासाठी विविध जनजागृती उपक्रम राबवत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

हा कार्यक्रम पोलीस अधीक्षक संदीप पालवे व उपविभागीय पोलीस अधिकारी वसंत भोये यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी विवेकानंद राळेभात, पोलीस हवालदार किरण आघाव आणि गजानन मेटांगे यांनी यशस्वीरीत्या पार पाडला. कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Post a Comment

أحدث أقدم