पिपळगाव राजात आदर्श गणेश पुरस्कारांचे वितरण
खामगाव : तालुक्यातील सर्वात मोठ्या व राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या गावांपैकी एक असलेल्या पिपळगाव राजा येथे गणेशोत्सव २०२६ च्या निमित्ताने आयोजित आदर्श गणराया पुरस्कार वितरण सोहळा १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता पोलीस स्टेशनमध्ये उत्साहात पार पडला. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट गणेश मंडळांना पुरस्कार व रोख रक्कम प्रदान करून गौरविण्यात आले.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता त्यातून सामाजिक एकोपा, जातीय सलोखा आणि बंधुभाव जोपासला जावा, तसेच गणेश मंडळांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजापुढे आदर्श निर्माण करावा, या उद्देशाने आदर्श गणराया पुरस्कार उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यंदाही या उपक्रमांतर्गत पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते सुदेश झांबड यांच्या वतीने पुरस्काराची रक्कम प्रदान करण्यात आली.
यंदाच्या आदर्श गणेश मंडळ पुरस्कारामध्ये प्रथम क्रमांक श्रीराम गणेश मंडळाने पटकावला. द्वितीय क्रमांक मराठा गणेश मंडळ, तृतीय क्रमांक आदर्श गणेश मंडळ, चतुर्थ क्रमांक जगदंबा गणेश मंडळ, पाचवा क्रमांक पंचमदास गणेश मंडळ, तर सहावा क्रमांक श्री सावता गणेश मंडळाने मिळविला. विजेत्या मंडळांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
*सामाजिक उपक्रम राबवा : प्रदीप पाटील*
गावात एकता आणि सामाजिक सलोखा कायम राखून गणेश मंडळांनी विविध सामाजिक उपक्रम राबवावेत आणि समाजापुढे आदर्श निर्माण करावा, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, सध्या रक्ताचा साठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. ही गरज लक्षात घेऊन प्रत्येक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. अशा सामाजिक उपक्रमांमुळे गरजू रुग्णांना मदत होईल, तसेच इतर गावांनाही प्रेरणा मिळेल. गणेश मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठाणेदार मुळीक यांनी केले.
कार्यक्रमाला शांतता समितीचे सदस्य श्रीराम वानखडे, पुंडलिक बोंबटकर, पिंटू धोरण, सचिन वानखडे, निकम सर, मधू बगाडे, सुरेश बगाडे, सुदेश झांबड, मुन्ना मुल्लाजी, रफिक शेख, शेख अब्दुल्ला, आहाद शेख, फारुख शेख, झुलकर नैन, विजय चोपडे, निखिल महाले, पत्रकार प्रशांत देशमुख, लुकमान परवाज यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, शांतता समितीचे पदाधिकारी आणि विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकता, बंधुभाव आणि जनसेवेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

إرسال تعليق