विश्व अन्न दिनानिमित्त दाऊदी बोहरा विद्यार्थ्यांचा सेवाभावी उपक्रम ....खामगाव शासकीय रुग्णालयातील २५० ते २६० रुग्णांना पौष्टिक फळांचे वाटप



खामगाव, दि. १६ ऑक्टोबर : विश्व अन्न दिनानिमित्त दाऊदी बोहरा समाजाच्या प्रोजेक्ट राईज अंतर्गत खामगाव येथील दाऊदी बोहरा मदरशाच्या विद्यार्थ्यांनी सेवाभावी उपक्रम राबवित शासकीय रुग्णालयातील सुमारे २५० ते २६० रुग्णांना पौष्टिक फळांचे वाटप केले.

दाऊदी बोहरा समाजाचे धर्मगुरू डॉ. मुफद्दल सैफुद्दीन साहेब यांच्या मानवसेवेच्या संदेशातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःच्या बचतीतून व स्वेच्छा योगदानातून निधी संकलित केला. या निधीतून सफरचंद, मोसंबी आणि केळी यांसारखी फळे खरेदी करून ती स्वच्छ धुऊन कापडी पिशव्यांमधून रुग्णांना वितरित करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत या उपक्रमात प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यात आला


.

विद्यार्थी व विद्यार्थिनींनी रुग्णालयातील विविध वॉर्डांमध्ये जाऊन रुग्णांना फळांचे वाटप केले. विद्यार्थिनींनी महिला रुग्ण विभागातील रुग्णांशी संवाद साधत त्यांची आस्थेने विचारपूस केली. या उपक्रमामुळे रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थ्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.

या उपक्रमाला खामगाव दाऊदी बोहरा समाजाचे आमिल साहेब शेख युसुफभाई शेख अहमदअलीभाई उज्जैनवाला, मदरसा समितीचे सदस्य आणि मुख्य मोअल्लिम सैफुद्दीन जमाली यांची उपस्थिती लाभली.

अन्नाचा सन्मान, पर्यावरण संरक्षण आणि गरजूंप्रती सेवाभाव यांचा संदेश देणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण ठरला.





Post a Comment

أحدث أقدم