राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव

 सज्जनशक्तीचा जागरणातूनच सामाजिक परिवर्तन शक्य - श्रीधर गाडगे

खामगाव : पंचमहाभूतांपासून बनलेल्या या जगात सज्जनशक्तीचे जागरण होणे महत्त्वाचे आहे. सामाजिक परिवर्तन घडवून आणायचे असेल, तर समाजातील सज्जनशक्तीला सोबत घेणे आवश्यक आहे. पर्यावरणाचे संतुलन जपतानाच समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्यावर भर दिला पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०१ वर्षे पूर्ण होत आहेत. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी विजयादशमीच्या दिवशीच संघाची स्थापना केली. त्यावेळी देश पारतंत्र्यात होता, तर आज देश स्वतंत्र आहे. गेल्या शंभर वर्षांपासून संघाचे कार्य सुरू असून, संघाच्या कार्याचा मुख्य आधार व्यक्तिनिर्माण हाच आहे. हिंदू समाज जातींच्या आधारावर विभागला गेला असताना समाजात एकात्मता निर्माण करणे आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणणे गरजेचे आहे. समाजातील सज्जनशक्तीला एकत्र आणून सकारात्मक बदल घडविता येतात. यासोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्याची जबाबदारीही प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे, 'देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखें' या भावनेतून प्रत्येकाने देशाप्रती आपले योगदान दिले पाहिजे असे प्रतिपादन विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी केले.

खामगाव येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदानात २४ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी डॉ. कालिदासजी थानवी (एम.डी. होमिओपॅथी, अध्यक्ष, मिशन ऑक्सिजन बहुउद्देशीय संस्था), तर जिल्हा संघचालक विठ्ठलपंत उर्फ बाळासाहेब काळे, तालुका संघचालक संतोष देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्ताविक परिचय  व आभार प्रदर्शन नगर कार्यवाह प्रसाद गाजूल यांनी केले. यावेळी नागरिक व मातृशक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विजयादशमी उत्सवानिमित्त स्वयंसेवकांचे शहरातून प्रमुख मार्गाने पथसंचलन काढण्यात आले. यावेळी संघ परिवारातील सर्व संघटनांच्या स्वयंसेवक व कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शविली. 

महात्मा गांधींची संघाच्या शिबिराला भेट

१९३४ मध्ये महात्मा गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका शिबिराला भेट दिली. यावेळी त्यांनी स्वयंसेवक कोणत्या समाजाचे आहेत, अशी विचारणा केली असता त्यांना कोणत्याही स्वयंसेवकांनी ते कोणत्या समाजाचे आहेत हे सांगितले नाही. पण शिबिरातील स्वयंसेवक १८ पगड जातींचे असूनही एकत्र राहत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. गांधीजींसाठी संघाच्या शिबिरातील सामाजिक समरसतेचा हा अनुभव महत्त्वपूर्ण ठरला.

व्यक्तिनिर्माणातून राष्ट्रनिर्माणाकडे संघाचे कार्य – डॉ. कालिदास थानवी

संघाने हिंदुत्वाची भावना जागृत ठेवण्याचे कार्य केले आहे. व्यक्तिनिर्माणातून राष्ट्रनिर्माण हे ध्येय समोर ठेवून संघाचे कार्य सुरू असून, समाजपरिवर्तनासाठी पंचपरिवर्तनातील पाच मुद्द्यांच्या माध्यमातून कार्य केले जात आहे, असे प्रतिपादन डॉ. कालिदास थानवी यांनी केले.



Post a Comment

أحدث أقدم