खामगाव : कर्नाटकातील काँग्रेस सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केवळ पाच हजार रुपयांची मदत जाहीर केल्याची टीका भाजप जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांनी केली आहे. मात्र, महाराष्ट्रातील शेतकरीही दुष्काळ आणि पिकांच्या नुकसानीमुळे आर्थिक संकटात असताना त्यांच्या खात्यात प्रत्यक्ष किती मदत जमा झाली, याचे उत्तर भाजपने द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्षाचे) खामगाव तालुकाध्यक्ष संजय बगाडे यांनी केली. दुसऱ्या राज्यातील शेतकऱ्यांच्या मदतीची तुलना करण्याऐवजी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळवून देण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी म्हटले.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या अग्रिम मदतीचा किती शेतकऱ्यांना लाभ मिळाला, पीकविम्याची किती रक्कम वितरित झाली आणि विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभार्थ्यांना किती फायदा झाला, याची आकडेवारी शासनाने जाहीर करावी, अशी मागणी बगाडे यांनी केली. तसेच केंद्र सरकारने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी किती मदत दिली, याबाबतही भाजपने स्पष्ट भूमिका मांडावी. शेतीमालाला योग्य हमीभाव, खते व बियाण्यांचे वाढते दर, निर्यातबंदीमुळे होणारे नुकसान आणि उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारे अपुरे उत्पन्न या प्रश्नांकडेही लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
दुष्काळ, पावसातील खंड आणि पिकांच्या नुकसानीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी भरीव आर्थिक मदत द्यावी, दुष्काळी सवलती जाहीर कराव्यात, वीजबिलात दिलासा द्यावा आणि कर्जमाफीबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी संजय बगाडे यांनी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर श्रेयवादाचे राजकारण करण्याऐवजी त्यांना प्रत्यक्ष मदत मिळवून देण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत. अन्यथा, शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.

Post a Comment