सिद्धिविनायक अभियांत्रिकी महाविद्यालयात अमली पदार्थ जनजागृती कार्यक्रम....विद्यार्थ्यांना व्यसनाचे दुष्परिणाम, सायबर गुन्हे आणि राष्ट्रीय सुरक्षेबाबत मार्गदर्शन


 (नितेश मानकर खामगाव) : सिद्धिविनायक अभियांत्रिकी महाविद्यालय, खामगाव येथे १६ ऑक्टोबर रोजी रेल्वे पोलिसांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी अमली पदार्थ जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात अमली पदार्थांचे दुष्परिणाम, व्यसनाधीनतेचे धोके, सायबर गुन्हे आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान अमली पदार्थांचे विविध प्रकार, व्यसन कसे जडते, तसेच त्याचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक जीवनावर होणारे दुष्परिणाम यांची माहिती देण्यात आली. अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग आढळल्यास त्यांच्या शैक्षणिक व वैयक्तिक आयुष्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, याबाबत उदाहरणांसह जागरूक करण्यात आले.



अमली पदार्थांची तस्करी, विक्री किंवा संशयास्पद हालचाली निदर्शनास आल्यास नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या १९३३ या हेल्पलाइन क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच व्यसनमुक्तीसाठी राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक १४४४६ च्या उपयोगाबाबतही माहिती देण्यात आली.

अमली पदार्थांच्या अवैध व्यापारातून दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत मिळण्याची शक्यता असल्याने हा विषय केवळ कायदा व सुव्यवस्थेपुरता मर्यादित नसून राष्ट्रीय सुरक्षेशीही संबंधित असल्याचे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. याशिवाय ऑनलाइन गेमिंग, सोशल मीडियावरील दिशाभूल, फेक न्यूज, सायबर गुन्हे आणि डिजिटल माध्यमांतून कट्टरतावादी विचारांचा प्रसार यांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले.


आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना विविध माध्यमांतून लक्ष्य करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींपासून सुरक्षित ठेवण्यासाठी जनजागृती आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी कोणत्याही संशयास्पद हालचालींकडे दुर्लक्ष न करता जागरूक आणि जबाबदार नागरिक म्हणून भूमिका बजावावी, असा संदेश देण्यात आला.

पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन

पोलीस अधीक्षक संदीप पालवे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वसंत भोये यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी विवेकानंद राळेभात, पोलीस उपनिरीक्षक हेमंत चोले, पोलीस हवालदार किरण आघाव आणि गजानन मेटांगे यांनी हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.

कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी या जनजागृती उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Post a Comment

أحدث أقدم