लायन्स आय हॉस्पिटलमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद...100 हून अधिक रुग्णांची तपासणी; मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची निवड
खामगाव : लायन्स क्लब खामगाव अंतर्गत लायन्स क्लब सर्व्हिस ट्रस्ट, खामगाव यांच्या वतीने लायन्स इंटरनॅशनलच्या व्हिजन वीक व साइटफर्स्ट उपक्रमांतर्गत गुरुवार, दि.१५ ऑक्टोबर २०२६ रोजी नगर परिषद लायन्स आय हॉस्पिटल, नांदुरा रोड, खामगाव येथे मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नेत्र विकाराने बाधित नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात 100 हून अधिक रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी मोतिबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या रुग्णांची पुढील शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली.
लायन्स इंटरनॅशनलच्या व्हिजन वीक उपक्रमांतर्गत नागरिकांमध्ये नेत्र आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, नेत्रविकारांचे वेळीच निदान करणे आणि गरजू रुग्णांना परवडणाऱ्या दरात नेत्रसेवा उपलब्ध करून देणे, हा या शिबिराचा प्रमुख उद्देश होता.
लायन्स क्लब सर्व्हिस ट्रस्ट, खामगाव यांच्या वतीने नगर परिषद लायन्स आय हॉस्पिटलच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून खामगाव व परिसरातील नागरिकांना नेत्र तपासणी, चष्मे वाटप तसेच मोतिबिंदू शस्त्रक्रियांसारख्या विविध नेत्रसेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या सेवांचा अनेक गरजू रुग्णांना लाभ होत आहे.
या शिबिरामध्ये लायन्स क्लब सर्व्हिस ट्रस्टचे संचालक व सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ लॉ. डॉ. संजीव राठोड, नेत्रतज्ज्ञ लॉ. डॉ. सौ. सुरेखा मेंढे तसेच लायन्स आय हॉस्पिटलच्या नेत्रतज्ज्ञ डॉ. सौ. राजश्री वानखडे , डॉ मंजूषा वराडे, डॉ मंजूषा महाले यांनी रुग्णांची नेत्र तपासणी केली. तपासणीनंतर मोतिबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या व शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या रुग्णांची निवड करण्यात आली. या रुग्णांवर नगर परिषद लायन्स आय हॉस्पिटल, खामगाव येथे सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
या शिबिराच्या यशस्वितेसाठी लायन्स क्लब सर्व्हिस ट्रस्टचे अध्यक्ष लॉ. डॉ. अशोक बावस्कर, उपाध्यक्ष लॉ. दिनेश गांधी, प्रकल्पप्रमुख तथा ट्रस्ट सचिव लॉ. अशोक केला, ट्रस्टी रमेश भूतडा, धर्मेश शहा, तेजस झांबड तसेच लायन्स क्लब खामगावचे अध्यक्ष लॉ. पिनेश कमानी, सचिव लॉ. श्रमिक जैसवाल व कोषाध्यक्ष लॉ. सागर गुर्जर, ला. मितेष कमानी, ला.डॉ. गिरीश पवार यांनी सहकार्य केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संबंधित पदाधिकारी व लायन्स सदस्यांनी परिश्रम घेतले, अशी माहिती लायन्स क्लब सर्व्हिस ट्रस्टचे सचिव लॉ. अशोक केला यांनी दिली.

Post a Comment