अखेर न्याय मिळाला!
अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी पित्याला मरेपर्यंत जन्मठेप
हिंगोली, दि. १७ :- अल्पवयीन मुलीवर अमानुष लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम पित्याला हिंगोली येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ श्रीमती एस.एन. माने-गाडेकर यांनी *'नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत आजन्म सश्रम कारावास व १ लाख २ हजार रुपये दंड'* अशी कठोर शिक्षा ठोठावली आहे. या निकालाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यातील एका गावात घडलेल्या या घटनेने माणुसकीला काळिमा फासला होता. आरोपी पित्याने एप्रिल २०२३ मध्ये आपल्या अल्पवयीन मुलीला गुलाबजामुनमध्ये गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच दि. २२ एप्रिल २०२३ रोजी रात्री हात-पाय बांधून जबरदस्तीने बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिली होती.
या प्रकरणी पीडितेने धाडस दाखवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार भा.दं.वि. कलम ३७६(२)(एफ), ३७६(३), ३२३, ५०६ सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीदेवी वग्गे यांनी अत्यंत बारकाईने करून विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील एन.एस. मुटकुळे यांनी १२ साक्षीदार तपासले. पीडित मुलीची व तपासिक अधिकाऱ्याची साक्ष निर्णायक ठरली.
न्यायालयाने सुनावलेली शिक्षा अशी :
कलम ३७६(२)(एफ) व ३७६(३) अंतर्गत प्रत्येकी आजन्म कारावास व ५०-५० हजार रुपये दंड, कलम ३२३ अंतर्गत ६ महिने कारावास व १ हजार रुपये दंड, तर कलम ५०६ अंतर्गत १ वर्ष कारावास व १ हजार रुपये दंड. सर्व शिक्षा एकत्र भोगाव्या लागणार आहेत.
दरम्यान, न्यायालयाने पीडित मुलीला शासनाच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आदेशही दिले आहेत.
या खटल्यासाठी सहा. सरकारी वकील एस.डी. कुटे, सविता देशमुख (जाधव) व कोर्ट पैरवी अंमलदार प्रमोद मारकड यांनी मोलाचे सहकार्य केले.

Post a Comment