वीरशैव लिंगायत समाज रुद्रभूमीतील विकासकामांचे आमदार फुंडकरांच्या हस्ते लोकार्पण
१ कोटी रु. खर्चून सुशोभीकरण, उद्यान, आदियोगी शिल्पाची उभारणी
खामगाव : जनोपचार न्यूज नेटवर्क :-जनोपचार न्यूज नेटवर्क येथील महाकाल चौकातील चिंतामणी मंदिरासमोर असलेल्या वीरशैव लिंगायत समाज रुद्रभूमीतील उद्यान, आदियोगी शिल्प व सुशोभीकरणाच्या कामाचे लोकार्पण करण्यात आले. आमदार ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते व साखरखेर्डा येथील मठाचे मठाधिपती श्री सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी १३ ऑक्टोबर रोजी हा भव्य सोहळा पार पडला.
या प्रसंगी आयोजीत कार्यक्रमात बोलतांना आमदार फुंडकर म्हणाले की मृत्यू हे अंतिम सत्य आहे. प्रत्येकाची शेवटची यात्रा स्मशानभूमि पर्यंत येऊन थांबते. त्यामुळे इतर नागरी सुविधांप्रमाणेच स्मशानभूमी विकसित करण्याचे काम सुरु आहे. मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आणला असून त्यातून रुद्रभूमि सारख्या ठिकाणांचे सुशोभीकरण केल्या गेले आहे. बऱ्याच वर्षांपासूनची असलेली गरज ओळखून वीरशैव लिंगायत समाज रुद्रभूमीसाठी स्व. भाऊसाहेब फुंडकर यांनी अथक प्रयत्न केले होते. त्यांच्या कारकिर्दीत सुरु झालेल्या या विकास कामासाठी मलाही निधी उपलब्ध करून देतांना समाधान लाभत आहे.
रुद्रभूमीच्या विकासासाठी पुढाकार घेणारे सतीशआप्पा दुडे यांनी ही जागा विकसित करण्यामागचा उद्देश सांगताना आलेल्या अडचणी व त्यावर केलेली मात याबद्दल प्रास्ताविकातुन माहिती दिली, इथे एवढे सुंदर व नियोजनपूर्वक काम झालेले असून येणाऱ्या काळात प्रत्येक शहरवासियांनी आवर्जून भेट द्यावी. फक्त अंत्ययात्रेसाठीच नव्हे अनेक रंगांची फुलझाडे, मोठी झाडे, लॉन, आदियोगींचे सुंदर शिल्प, महात्मा बसवेश्वरांचा अर्धाकृती पुतळा, फिरण्यासाठी वॉकिंग ट्रॅक, स्वच्छ पाणी अशा अनेक सुविधा करण्यात आल्या आहेत. या जागेचे जतन करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांनी हिंदू संस्कृतीत मृत्यू सोहळ्याचे पवित्रतेबद्द्दल प्रबोधन केले. इच्छा असो वा नसो प्रत्येकाला यासाठी तयार राहावे लागते. मृत्यनंतर पार्थिवाची शेवटची यात्रा स्मशानभूमीपर्यंत येते. साहजिकच अंत्ययात्रेत आल्यानंतर लोकांना उदासिनता, जगण्याची निरर्थकता वाटते. त्यामुळे लोक फक्त अंत्ययात्रेच्या वेळीच तिथे जातात. मात्र रुद्रभूमी एवढी सुदंर झाली आहे की लोकांनी इथं नियमित येऊन मानसिक शांती प्राप्त करावी असे ते म्हणाले. आभार प्रदर्शन लिंगायत समाजाचे अध्यक्ष अजय माटे यांनी केले तर संचलन निखिल व नम्रता लाठे या उभयतांनी केले. या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात समाजबांधवांची उपस्थिती होती.



إرسال تعليق