माऊली श्री समर्थ सद्गुरू नरहरी बाबा यांची 96 वी जयंती जन्मभूमी असलेल्या प्रती पंढरपूर भालेगांव बाजार येथे उत्साहात साजरी
जनोपचार खामगांव :- माऊली समर्थ सद्गुरू नरहरी बाबा यांची 96 वी जयंती टाळ,मृदुगांच्या गजरात,पालखी घोड्यासह,त्यांची जन्मभूमी असलेल्या तथा प्रती पंढरपूर म्हणुन नावलौकिक असलेल्या भालेगाव बाजार येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. पालखीची सुरुवात त्यांच्या राहत्या घरापासुन सुरू होऊन भजन-कीर्तनाच्या गजरात भालेगाव बाजार येथील आश्रम,बाबांचा मळा, या ठिकाणापर्यंत मोठ्या उत्साहात हजारो भाविक भक्तांच्या उपस्थिती मध्ये दिंडी सोहळा काढण्यात आला.नरहरी बाबा यांच्या मानस कन्या ह.भ.प.कु. ललिताबाई दबडघाव व नरहरी बाबा यांचे वंशज श्रीकृष्ण मांडवेकर यांच्या हस्ते पालखी सोहळ्याचे पूजन करून जन्म भूमी वरून पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले. पालखी मुक्ताबाई मंदिर, विठ्ठल मंदिर, संताजी महाराज मंदिर, श्रीराम मंदिर,शिव मंदिर,हनुमान मंदिर, बस स्थानक,श्री. खंडेश्वर मंदिर या मार्गाने भजन करीत नरहरी बाबांच्या आश्रमात हा सोहळा पोहचला.या ठिकाणी ह.भ.प.श्री प्रकाश महाराज मोरखडे यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत करत आश्रमात टाळ मृदंगाच्या तथा हरिनामाच्या गजरात पालखी सोहळ्याचे पावली करत रिंगण सोहळा संपन्न झाला. नंतर ह.भ.प.श्री प्रकाश महाराज मोरखडे यांच्या
काल्याच्या किर्तनाने या दिमाखदार सोहळ्याची सांगता झाली. महाराजांनी आपल्या कीर्तनातून माऊली श्री समर्थ सद्गुरू नरहरी बाबा यांच्या कार्याचा उजाळा हजारो भाविकांसमोर उत्तमरीत्या सादर केला. त्यानंतर हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.या सर्व दिंडी-पालखी सोहळ्याची शोभा भालेगाव बाजार येथील सुलेमान शाह यांच्या घोड्याने केलेल्या पावलीने भाविकांना आकर्षित करत वाढवली. या जयंती उत्सव सोहळ्याला भालेगाव बाजार, कुंबेफळ, वर्णा,पिंपळगाव राजा, निपाना, जळका, बोरजवळा, पोरज, तांदुळवाडी, निमकवळा, येथील सर्व महाराज मंडळी तथा टाळकरी मंडळी यांचे मोलाचे योगदान लाभले.तसेच श्री संत गजानन महाराज महिला सेवाधारी मंडळी यांचे सुद्धा विशेष सहकार्य लाभले.

Post a Comment