खामगाव शहरातील अतिक्रमणधारकांना व्यवसायासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्या - राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ चौकसे यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन 

खामगांव प्रतिनिधी : खामगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक  यांच्या आदेशान्वये २७ व २८ जुन २०२५ रोजी अतिक्रमण हटाय मोहीम राबविण्यात आली असून यामुळे अतिक्रमण धारकावर उपासमारीची वेळ आली आहे. तरी या अतिक्रमण धारकांना आपला उदरनिर्वाह भागविणे व व्यवसाय सुरू करण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ चौकसे यांनी जिल्हाधिकारी यांना पाठविले आहे.    


  
 सदर निवेदनात नमूद आहे की,ज्या अतिक्रमणापासून रहदारीला अडथळा निर्माण होत होता असे अतिक्रमण काढणे योग्य होते. परंतू ज्या अतिक्रमणापासून कोणालाच काहीच त्रास नव्हता अश्या गल्लीबोळातील अतिक्रमणे सुध्दा काढून नगर परिषद प्रशासनाने नागरिकांवर उपासमारीची वेळ आणणे ही बाब खेदजनक तथा निषेधार्ह आहे.या अतिक्रमण हटाव मोहीमेमुळे शहरातील जवळपास १५०० ते २००० कुटुंब बेरोजगार झाले आहेत. त्यामध्ये ज्यांना नोकऱ्या नाहीत असे शिकलेले बेरोजगार, ज्येष्ठ नागरिक, अपंग नागरीक मोठ्या संख्येने आहेत. जे कमीत कमी भांडवलात व्यवसाय करुन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते.

बेरोजगारांना रोजगार देणे ही शासनाची जबाबदारी आहे. मात्र ज्यांना रोजगार नाही ते छोटे मोठे उद्योग सुरु करुन ते आपल्या कुटूंबाची जबाबदारी सांभाळीत होते. तसेच बऱ्याच अतिक्रमण धारकांनी पीएमस्वनिधी, मुद्रा लोन अशा अनेक शासकीय योजनांमधून कर्ज घेवून आपले व्यवसाय सुरु केले होते. अतिक्रमण हटाव मोहीमेमुळे अश्या लोकांनी पुढील कर्ज न भरल्यामुळे शासनाचे आर्थिक नुकसान होऊ शकते व याची जबाबदारी शासनावर राहील.राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी आहे की, अतिक्रमण काढलेल्या जागेत १० बाय १५ फुटांची टिनाची दुकाने काढून ज्यांचे ज्या-ज्या ठिकाणी अतिक्रमण होते त्यांना त्या त्या ठिकाणी किंवा मागणी करतील त्या ठिकाणी मासिक भाड्याने पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्यात यावी. जेणेकरुन ते आपल्या कुटुंबाची उपजिविका चालवू शकतील व प्रशासन तसेच सरकारविषयी या अतिक्रमण हटाव मोहीमेमुळे जो रोष निर्माण झाला आहे तो कमी होण्यास मदत होईल. यासंदर्भात आपल्या स्तरावरुन शासन दरबारी योग्य ती कार्यवाही व्हावी असेही निवेदनात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांनी नमूद केले आहे. सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसुल मंत्री,पालकमंत्री,प्रधान सचिव, नगर विकास-२,जिल्हा पोलीस अधिक्षक, अति. जिल्हा पोलीस अधिक्षक,एस.डी.ओ.मुख्याधिकारी, नगर परिषद व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांना पाठविण्यात आलेल्या आहे

Post a Comment

Previous Post Next Post