पीएम स्वनिधी योजनेचा कालावधी अखेर वाढला: ३१ मार्च २०३० पर्यंत घेता येईल लाभ
17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान लोक कल्याण मेळावाखामगांव : जनोपचार न्यूज नेटवर्क : केंद्र शासनाने नुकताच पंतप्रधान स्ट्रीट व्हेंडर आत्मनिर्भर निधी PMSVANidhi (पीएम-स्वनिधी) या योजनेचा कर्ज कालावधी ३१ डिसेंबर २०२४ वरून वाढवून आता ३१ मार्च २०३० पर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे खामगांव शहरातील अनेक फेरीवाले, लघुउद्योजक व कुटुंबांना योजनेचा लाभ अधिक काळासाठी घेता येणार आहे.
![]() |
| जाहिरात |
योजनेत सुधारणा करून पहिल्या टप्प्यातील कर्ज मर्यादा १०,००० वरून १५,००० रुपये आणि दुसऱ्या टप्प्यातील कर्ज मर्यादा २०,००० वरून २५,००० रुपये इतकी वाढविण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यातील कर्ज मर्यादा ५०,००० रुपये यथावत आहे. याशिवाय, योजनेचा लाभ घेणाऱ्या आणि वेळेवर हप्ता परत करणाऱ्या फेरीवाल्यांना यूपीआय-लिंक्ड रूपे क्रेडिट कार्ड उपलब्ध होणार असून त्याद्वारे अचानक उद्भवणाऱ्या व्यवसाय व वैयक्तिक गरजांसाठी तत्काळ आर्थिक मदत मिळू शकेल. योजनेअंतर्गत फेरीवाल्यांना डिजिटल व्यवहारांवर १,६०० रूपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे
फेरीवाले, हातगाडीधारक व छोटे उद्योजक यांनी शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभघ्यावा. यामुळे आर्थिक सशक्तीकरणा बरोबरच डिजिटल व्यवहारांमुळे व्यवसायाला नवे दालन खुले होईल. त्यामुळे खामगावातील प्रत्येक पात्र नागरिकाने तात्काळ नगर परिषद कार्यालय किंवा शहर उपजीविका केंद्र, DAY NULM नगर परिषद खामगाव येथे संपर्क साधून अर्ज करावा, असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ . प्रशांत शेळके यांनी केले आहे.
याशिवाय, केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दि 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान लोक कल्याण मेळावा आयोजित करण्यात आला असून यामध्ये फेरीवाल्यांना उद्योजकता, आर्थिक साक्षरता, डिजिटल कौशल्ये आणि मार्केटिंग यांसारख्या बाबींवर विशेष प्रशिक्षण दिले जाणार असून शहरातील स्ट्रीट फूड विक्रेत्यांसाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांच्या साहाय्याने स्वच्छता व अन्नसुरक्षा प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे.


Post a Comment