अक्षय डिडवाणीया यांनी वर्ल्ड यूथ फेस्टिव्हल असेंब्ली, रशिया येथे भारताचे प्रतिनिधित्व केले
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव: - १७ ते २१ सप्टेंबर दरम्यान रशियातील निजनी नोवगोरोद येथे झालेल्या वर्ल्ड यूथ फेस्टिव्हल असेंब्लीमध्ये ब्रिक्स+ युथ फोरम आणि देवकीद्वार फाउंडेशनचे संस्थापक अक्षय डिडवाणीया यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. या आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण कार्यक्रमात जगभरातील १९० देशांमधील सुमारे १००० प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी पाहुण्यांना व सहभागी प्रतिनिधींना शुभेच्छा संदेश पाठविला. उपपंतप्रधान दिमित्री चर्नीशेंको यांनी राष्ट्रपतींचा संदेश वाचून दाखविला. राष्ट्रपतींनी २०२४ मध्ये सिरियस येथे यशस्वीरीत्या पार पडलेल्या वर्ल्ड यूथ फेस्टिव्हलचा उल्लेख करत आंतरराष्ट्रीय युवा सहकार्यास आणखी गती देण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी म्हटले की, “अशा प्रकारचा महत्त्वाचा आणि फलदायी संवाद सातत्याने सुरू राहणे आवश्यक आहे. या उद्दिष्टांसाठी आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप क्लब कार्यरत आहेत, जे संयुक्त प्रकल्प आणि उपक्रम राबवतात आणि जगभरातून आलेल्या युवक-युवतींमध्ये व्यावसायिक संवाद वाढवतात. यावर्षी प्रथमच वर्षभर चालणाऱ्या युवा शैक्षणिक केंद्रांमध्ये समर स्कूल्स सुरू झाले आहेत. आणि अर्थातच, अशा मोठ्या प्रमाणातील महोत्सवी कार्यक्रम दरवर्षी आपल्या देशात होणार हे आनंददायी आहे. मी तुम्हाला यश, तुमच्या योजना पूर्ण होणे आणि उत्तम भविष्यासाठी शुभेच्छा देतो.”
या प्रसंगी अक्षय डिडवाणीया यांनी दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) केले. पहिला सामंजस्य करार ब्रिक्स+ युथ फोरम आणि सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल फ्रेंडशिप क्लब यांच्यात झाला, ज्याद्वारे भारतीय व रशियन युवकांमध्ये सांस्कृतिक देवाण-घेवाण व सहकार्य वाढवले जाईल. मुंबई व सेंट पीटर्सबर्ग या सिस्टर सिटीज असल्याने या कराराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
दुसरा सामंजस्य करार खामगाव येथील ब्रिक्स+ युथ फोरम आणि इरकुत्स्क रिजनच्या युवा धोरण मंत्रालय यांच्यात करण्यात आला. या करारामुळे भारत व रशिया युवकांमध्ये शैक्षणिक, सांस्कृतिक आणि शास्त्रीय देवाण-घेवाणीसाठी नवीन संधी निर्माण होणार आहेत.
इंटरनॅशनल फोरम ऑन स्पेशल इकॉनॉमिक झोन्समध्येही अक्षय डिडवाणीया यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी भारताचे विशेष आर्थिक क्षेत्र (Special Economic Zones) यांचे सादरीकरण करत इन्व्हेस्ट इन इंडिया आणि मॅग्निफिसंट महाराष्ट्र या विषयांवर प्रभावी प्रेझेंटेशन केले. महाराष्ट्रातील औद्योगिक क्षमता, गुंतवणुकीची संधी व भारताचे वेगाने वाढणारे आर्थिक सामर्थ्य यावर त्यांनी परदेशी गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले.
या उपक्रमांविषयी बोलताना अक्षय डिडवाणीया म्हणाले, “भारत-रशिया मैत्री ही ऐतिहासिक आहे. आता युवकांच्या माध्यमातून ही नाती आणखी मजबूत होत आहेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, वैज्ञानिक व उद्योजकीय सहकार्यातून युवकांसाठी दीर्घकालीन संधी उपलब्ध होणार आहेत. भारतीय युवकांनी BRICS+ Youth Forum च्या विविध कार्यक्रमात सहभागी होऊन या संधींचा लाभ घ्यावा.”
भारत-रशिया युवक संबंध दृढ करण्यासाठी आणि भविष्यातील युवकांना विकास, उद्योजकता, नवकल्पना व शिक्षणाच्या क्षेत्रात टिकाऊ संधी उपलब्ध करून देण्यासाठी हे करार आणि उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहेत, असे मानले जात आहे. अशी माहिती राजकुमार गोयनका यांनी दिली.

إرسال تعليق