गो. से. महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात
खामगाव (जनोपचार न्यूज नेटवर्क) विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव संचलित गो.से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालयातील रा.से.यो. पथकाद्वारे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात उपप्राचार्य डॉ. प्रफुल्ल उबाळे, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. टी. अढाऊ, सह-कार्यक्रमाधिकारी प्रा. उमेश खंदारे तसेच विद्यार्थी यांच्या उपस्थितीत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. उमेश खंदारे यांनी केले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी मनोगते सादर केली. उपप्राचार्य डॉ. प्रफुल्ल उबाळे यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व घडविण्यातील शिक्षकांचे अनमोल योगदान अधोरेखित केले. कु. धनश्री पिळवटकर हिने शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी कविता सादर केली.या प्रसंगी प्रा. डॉ. अढाऊ यांनी शिक्षक विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकास घडविण्यात मोलाची भूमिका बजावतात, असे प्रतिपादन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा सल्ला दिला.
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा. डॉ. खडसे, रा.से.यो.चे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर सरांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा.से.यो. स्वयंसेविका कु.पूजा हिने केले तर कु. दीक्षा ढोके हिने मान्यवरांचे आभार मानले. असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे डॉ. रागीब देशमुख यांनी कळविले आहे.


Post a Comment