प्रा. लक्ष्मण हाके यांनी जीआर फाडला : ज्येष्ठ पत्रकार श्रीधर ढगे यांची खामगाव पोलिस ठाण्यात तक्रार
खामगाव (प्रतिनिधी) :आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर समाजात तेढ निर्माण करणारे कृत्य केल्याचा आरोप करत प्रा. लक्ष्मण हाके (रा. सांगोला, जि. सोलापूर) यांच्या विरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार स्थानिक पत्रकार तसेच ओटीटी डिजिटल मिडियाचे संपादक श्रीधर ढगे यांनी दिनांक ४ सप्टेंबर रोजी केली. प्रा. हाके यांच्या मराठा आरक्षणाचा जीआर फाडत केलेल्या कृत्यामुळे समाजात कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारदार श्रीधर ढगे हे शहरातील पोलिस ठाण्यासमोरील टॉवर चौक भागात थांबलेले असताना मोबाईलवर एका परिषदेचे थेट प्रक्षेपण पाहत होते. या परिषदेत प्रा. हाके उपस्थित होते. त्यांच्या हातात महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात काढलेला शासन निर्णय (जी.आर.) असल्याचे व्हिडिओमध्ये दिसले. या परिषदेत प्रा. हाके यांनी केलेल्या कृत्यामुळे शासनाच्या आदेशाचा अवमान होत असल्याचे जाणवले. एवढेच नव्हे, तर त्यांच्या वक्तव्यांमुळे ओबीसी व मराठा समाजात वैमनस्य निर्माण होईल, असा ठपका तक्रारदाराने ठेवला आहे.
पत्रकार श्रीधर ढगे यांनी आपल्या तक्रारी म्हटले आहे की, “मी पत्रकार असून सामाजिक भान असलेला नागरिक आहे. प्रा. हाके यांचे विधान व शासन आदेश फाडण्याचे कृत्य ओबीसी व मराठा समाजामध्ये तणाव निर्माण करणारे आहे. त्यातून भविष्यात दंगल उसळण्याची शक्यता आहे. शासनाचा अधिकृत निर्णय हातात असूनही त्यांनी त्याचा विपर्यास करून समाजात तेढ पेरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदवून तातडीने अटक व्हावी.” असे त्यांनी नमूद केले आहे. तसेच तक्रारीत प्रा. हाके यांच्यावर भादवी कलम १५३, १५३-अ – समाजात वैमनस्य व तेढ निर्माण करणे. भादवी कलम ५०५ – जातीयदृष्ट्या अपमान करून भडकावणे. भादवी कलम ५०५(२) – समुदायांमध्ये वैरभाव व दंगल निर्माण करण्यासाठी केलेले कृत्य. भादवी कलम १८६ – शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे. कलमान्वये गुन्हा नोंदवावा, अशी मागणी तक्रारदार यांनी करण्यात आली आहे. सदर तक्रार खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.
प्रतिलिपी वरिष्ठांकडे-
ही तक्रार केवळ पोलिस ठाण्यातच न थांबता, राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलिस महासंचालक, कामगार मंत्री आ. आकाश फुंडकर तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक आदींना प्रतिलिपी पाठवण्यात आल्या आहेत.
स्थानिकांमध्ये चर्चा-
आरक्षणाचा प्रश्न आधीच तापलेला असताना प्रा. हाके यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे स्थानिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. समाजात तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने वेळेत पावले उचलावीत, अशी नागरिकांची मागणी आहे.
एकूणच, प्रा. लक्ष्मण हाके यांच्या विधानांवरून दाखल झालेली तक्रार आता कायदेशीर पातळीवर गांभीर्याने घेतली जाणे आवश्यक असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

Post a Comment