भेंडवळ: “स्वामी विवेकानंद हायस्कूल” मध्ये माजी विद्यार्थी स्नेहमेळावा
भावनिक मनोमिलनाने भारलेले ऐतिहासिक वातावरणात शिक्षकांचा गौरव
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव: - जिल्ह्यातील ऐतिहासिक व शैक्षणिक परंपरेसाठी प्रसिद्ध असलेल्या भेंडवळ गावातील स्वामी विवेकानंद हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा एकत्र स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. “गुरु हेच खरे देव” या भावनेतून 2010-2012 या बॅचचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने एकत्र येऊन शाळेतील शिक्षकांचा सन्मान केला व एक संस्मरणीय स्नेहभोजनाचा आनंद घेतला.
या कार्यक्रमात डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर तसेच राजकीय क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेले माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. आपल्या मातीशी, आपल्या गुरूंशी असलेली नाळ जपत त्यांनी पुन्हा एकदा शाळेच्या पायरीवर नतमस्तक होत स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेची भेट शाळेला अर्पण केली.विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा काळ (2010 ते 2012) हा शाळेच्या संघर्षमय टप्प्यातील होता. त्या काळी शाळेत ना इमारत, ना आवश्यक सुविधा — तरीही गुरूंच्या कष्टातून, विद्यार्थ्यांच्या जिद्दीतून ज्ञानसंपदा घडली आणि आज तीच गुरुदक्षिणा परत करण्याचा प्रयत्न या स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून झाला.
या कार्यक्रमात श्री. धनंजय गायगोळ सर, श्री. विठ्ठल देवचे सर, श्री. के.के. घाटे सर, श्री. अशोक गुळवे सर, श्री. विनोद खुपासे सर कु. पुष्पा कसूरकार मॅडम आदी शिक्षकांचा माजी विद्यार्थ्यांनी सत्कार करून “आम्ही जे आहोत ते तुमच्या संस्कारांमुळे” अशी कृतज्ञ भावना व्यक्त केली.
शिक्षक, माजी विद्यार्थी आणि पालक यांच्या संवादातून शाळेच्या पुढील वाटचालीबाबत नवे संकल्प व्यक्त झाले. वरिष्ठांनी विद्यार्थ्यांना भावी यशासाठी शुभेच्छा दिल्या.या उपक्रमामुळे भेंडवळ गावाचा व स्वामी विवेकानंद हायस्कूलचा गौरव पुन्हा उजळला असून, हा स्नेहमेळावा संपूर्ण जिल्हाभर कौतुकाचा विषय ठरत आहे. नागरिकांमधून असे मत व्यक्त केले जात आहे की — “अशा जाणीव असलेल्या, गुरूंची कदर करणाऱ्या विद्यार्थ्यांमुळेच समाजात खरी मूल्यसंस्कृती जिवंत राहते.”



Post a Comment