महात्मा गांधींची प्रतिमा, प्रतिभा, आणि प्रभाव चिरंतन - डॉ. शिरीष खेडगीकर
सिद्धेश्वर स्वामी यांना आंतरभारतीचा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार
जनोपचार न्यूज नेटवर्क अंबेजोगाई :- 12 ऑक्टोबर 2025 रोजी आंतरभारती शाखा अंबाजोगाईच्या वतीने उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार सिद्धेश्वर स्वामी यांना डॉ. शिरीष खेडगीकर यांच्या हस्ते व ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब, आंतरभारतीच्या अध्यक्ष प्राध्यापक डॉ. शैलजा बरुरे, सचिव संतोष मोहिते यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. याप्रसंगी डॉ. शिरीष खेडगीकर यांनी 'महात्मा गांधींची धर्मचिकित्सा' या विषयावर व्याख्यान दिले. महात्मा गांधींचा संपूर्ण जगभर प्रभाव असून त्यांची प्रतिमा व प्रतिभा ही अनन्य होती ,असे म्हटले. महात्मा गांधींनी मानवाची सेवा, त्याग, सत्य व अहिंसेलाच ईश्वर मानले होते. महात्मा गांधी स्वतःला सनातनी हिंदू म्हणत असले तरी सर्वधर्मसमभाव व धार्मिक सहिष्णुतेला त्यांनी आपले जीवित कार्य मानले. बायबल, कुराण व जगातील सर्व धर्मांचा महात्मा गांधींनी अभ्यास करून नैतिकता हाच श्रेष्ठ धर्म असल्याचे गांधीजींनी मत व्यक्त केले आहे, असे प्रतिपादन डॉ. शिरीष खेडगीकर यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आंतरभारतीच्या अध्यक्ष डॉ. शैलजा बरुरे यांनी केले. धर्म आणि नैतिकता या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून मानवी समूहाला संघटित व नैतिक राहण्यासाठी धर्माची आवश्यकता होती असे गांधीजींनी सांगितली असल्याचे प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार अमर हबीब होते. त्यांनी देश समजून घेण्यासाठी महात्मा गांधी समजून घेणे अनिवार्य असल्याचे मत व्यक्त केले. जग सुंदर करण्यासाठी महात्मा गांधींनी भारताला प्रयोगशाळा समजून विविध प्रयोग केले असे आपल्या अध्यक्षीय समारोपात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आंतरभारती शाखा अंबाजोगाईचे सचिव श्री. संतोष मोहिते यांनी केले. सिद्धेश्वर स्वामी यांचा परिचय ऍड. प्रवीण बजाज यांनी करून दिला. सिद्धेश्वर स्वामी यांनी आपल्या मनोगतात अंबाजोगाईतील विविध व्यक्तींच्या व अंतरभारतीच्या उपक्रमांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संघर्षातून प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महावीर भगरे, शरद लंगे, वैजनाथ शेंगोळे, अविष्कार जंगले, प्रथमेश उपाडे यांनी प्रयत्न केले .
या कार्यक्रमासाठी पाटोदा(म.) येथील ग्रामस्थ, स्वामी कुटुंबीय व अंबाजोगाईतील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

Post a Comment