चोर समजून एकाला बेदम मारहाण.... मारहाणीत त्याचा मृत्यू... सात जणांवर खुनाचा गुन्हा दाखल; मलकापूर तालुक्यातील घटना

मलकापूर (जनोपचार न्यूज नेटवर्क) तालुक्यातील झोडगा गावात चोरीच्या संशयावरून गावकऱ्यांनी एकाला  बेदम मारहाण केली. या मारहाणीत सदर मजुराचा मृत्यू झाला असून मलकापूर शहर पोलिसांनी सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.  ही घटना आज मंगळवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली असून मृतक हा नेपाळी मजूर असल्याचे समोर आले आहे.

       मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना सकाळी माहिती मिळाली की, ग्राम झोडगा येथे गावकऱ्यांनी एका चोराला पकडून ठेवले असून त्यास मारहाण केली जात आहे. त्यानुसार पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या ठिकाणी काही गावकऱ्यांनी एक व्यक्तीला बांधून ठेवले असल्याचे पोलिसांना आढळले. त्याच्या शरीरावर हात, पाय, पोट व डोक्यावर गंभीर जखमा झाल्या होत्या. सदर जखमीला तत्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. मृतकाचे नाव बुद्धीराम लामण चौधरी (वय 50, रा. नैनीवाल, जि. डांग, नेपाळ) असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
     या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून पांडुरंग दिनकर भोळे (42), मिलिंद मधुकर भोळे, गोपाल सुधाकर नारखेडे, सतीश बालकृष्ण फिरके, गौरव सरोदे, शंकर भारंबे आणि दत्तात्रय गजानन खडसे (सर्व रा. ग्राम झोडगा) या सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
  प्राथमिक तपासानुसार, गावकऱ्यांनी मृतकास चोर समजून त्यास लाठी, काठी, लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कौळासे करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post