निवडणूक कालावधीत आचार संहितेचे काटेकोर पालन करावे

उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी  डॉ.रामेश्वर पुरी

जनोपचार न्यूज नेटवर्क

खामगाव (उमाका), दि. १३ : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. सर्व विभागांनी या निवडणुकीत प्राधान्यक्रम आणि तातडीने करावयाची कार्यवाही करावी. तसेच संपूर्ण निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश उपविभागीय अधिकारी तथा डॉ रामेश्वर पुरी यांनी दिले.

 आचारसंहितेच्या अनुषंगाने सर्व विभाग प्रमुख आणि  पथक प्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी , खामगाव नगरपरिषद मुख्यधिकारी प्रशांत शेळके ,  उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, उपजिल्हाधिकारी कल्पेश तायडे, उपविभागीय कृषी अधिकारी बी जी व्यवहारे,  उपस्थित होते. नामांकन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेपासून मतमोजणी विविध टप्प्यावर अनुषंगीक कार्यवाही करण्यात यावी. आदर्श आचारसंहितेच्या पहिल्या टप्प्यात लोकप्रतिनिधींचे छायाचित्र किंवा नाव हटविण्याची प्रक्रिया तातडीने करण्यात यावी. तसेच कार्यालयांनी त्यांच्याकडील सुरु असलेली कामे आणि पूर्ण झालेली कामे यांची माहिती तातडीने सादर करावी. निवडणुकीच्या अनुषंगाने वाहनांची व्यवस्था करण्यात यावी. निवडणूक कालावधीत शासकीय वाहनांचा दुरुपयोग होऊ नये, याची काळजी घ्यावी, असे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले.



निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया, मतमोजणीचे प्रशिक्षण देण्यात येतील. या प्रशिक्षणादरम्यान निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांना मतदानाची सोय करण्यात आली आहे.  नागरिकांनी निवडणूक प्रक्रियेत सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.रामेश्वर पुरी यांनी केले.

  नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५ च्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीची सर्व प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी संबंधित यंत्रणांनी वेगाने कामकाज पार पाडावे. निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी त्यांच्यावर सोपविलेल्या कामकाजाची प्रभावी अंमलबजावणी सुरु करावी. सर्व भरारी पथकांचा प्रभावी वापर करणे आवश्यक असून, एसएसटी, एफएसटी अशी भरारी  पथके तात्काळ कार्यान्वित करावीत. येणाऱ्या तक्रारींबाबत वेळेत कारवाई होणे आवश्यक आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने आचारसंहितेच्या काळात चोख कारवाई करुन, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सक्त कारवाई करावी, असे निर्देश उपविभागीय अधिकारी तथा  निवडणूक अधिकारी डॉ रामेश्वर पुरी यांनी दिले. 

सर्व समितीच्या पथक प्रमुखांनी वेगाने कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी दिले. आचारसंहितेच्या अनुषंगाने वेळेत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. सर्व संबंधितांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय इमारती, होर्डींग्जवरील संदेश, पोस्टर, झेंडे, पताका त्वरीत काढून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. प्रभाग अधिकाऱ्यांनी वेळोवेळी प्रभागाची पाहणी करुन नव्याने, फलक लावले जाणार नाही, याची काळजी घ्यावी. असे निर्देश यावेळी उपविभागीय अधिकारी तथा  निवडणूक अधिकारी रामेश्वर पुरी यांनी यावेळी दिले. 

Post a Comment

Previous Post Next Post