यश हे सातत्यपूर्ण प्रयत्न, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोनात दडलेले -सौ. अपर्णाताई फुंडकर
शेगाव:- येथील सिद्धीविनायक टेक्निकल कॅम्पस येथे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई (MSBTE) यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या हिवाळी २०२५ डिप्लोमा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसुंधरा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सागरदादा फुंडकर तर खामगाव नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. अपर्णाताई सागर फुंडकर या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनंतजी कुलकर्णी, तंत्रनिकेतन प्राचार्या प्रा. प्रिती चोपडे, तंत्रनिकेतन अधिष्ठाता प्रा. सचिन इंगळे, डॉ. धीरज वानखेडे, तसेच कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पिंगळे साहेब, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व माता सरस्वती पूजनाने झाली तसेच लोकनेते महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी मंत्री स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तंत्रनिकेतन प्राचार्या प्रा. प्रीती चोपडे यांनी भाषणात विद्यार्थ्यांच्या यशाचे महत्त्व सांगताना असे उल्लेख केले की, “आजचा हा दिवस केवळ प्रमाणपत्रांचा नसून परिश्रम, चिकाटी, शिस्त व आत्मविश्वासाच्या विजयाचा उत्सव आहे.”या समारंभात अभियांत्रिकी शाखांमधील प्रथम, द्वितीय व अंतिम वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
MSBTE हिवाळी २०२५ परीक्षेत उत्कृष्ट गुण संपादन करून संस्थेचा नावलौकिक वाढविणाऱ्या विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले. त्यानंतर मा. सौ. अपर्णाताई फुंडकर यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, “यश हे केवळ गुणांमध्ये नसून सातत्यपूर्ण प्रयत्न, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन यात दडलेले असते.” तर अध्यक्षीय भाषणात अपर्णा ताई फुंडकर यांनी विद्यार्थ्यांनी अपयशाला न घाबरता सातत्याने प्रयत्न करत राहण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या सत्कार समारंभामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य, आत्मविश्वास व प्रेरणा निर्माण झाल्याचे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. भक्ती चौधरी आणि कु. आनंदी वानखडे यांनी केले असून आभार प्रदर्शन कु. अक्षदा कवडकर हिने केले. व कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सिद्धीविनायक टेक्निकल कॅम्पसचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.








إرسال تعليق