वाहिनीच्या खून प्रकरणात दिराला जन्मठेप
जनोपचार न्यूज नेटवर्क हिंगोली : लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून भावजयीचा खून करणाऱ्या आरोपी दीरास जिल्हा न्यायाधीश एस.एन. माने- गाडेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
या निकालाची जिल्हा सरकारी वकिलांनी दिलेली माहिती अशी, हिंगोली तालुक्यातील जोडतळा येथे २२ जुलै २०२० रोजी सविता जाधव ह्या सोयाबीनचे पीक निंदून इतर महिलांसमवेत झाडाखाली जेवणासाठी बसल्या होत्या. त्यावेळी सविता यांच्या मागून येऊन त्यांचा दीर माधव उर्फ रामेश्वर समाधान जाधव याने सविता यांच्या डोक्यात कुन्हाडीने मारले. तेव्हा सविता यांचा लहान मुलगा मांडीवरून बाजूला पाडला. तरीही आरोपी हा सविता यांना कुन्हाडीने मारतच होता. घरातील लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून सविता हिचा दीराने निघृण खून केला. याप्रकरणी रामकिशन नंदकिशोर काळबांडे यांनी २२ जुलै रोजी बासंबा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून गुन्हा नोंद झाला होता.तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक आर.एच. मलपिल्लू, अंमलदार बाबाराव धाबे यांनी या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. २७ जानेवारी रोजी जिल्हा न्यायाधीश एस.एन. माने-गाडेकर यांच्या न्यायालयासमोर सुनावणी झाली. त्यात आरोपी माधव उर्फ रामेश्वर समाधान जाधव यास जन्मठेप तसेच ५० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. दंडाची पूर्ण रक्कम मयत सविताच्या तिन्ही मुलांना द्यावी, असाही आदेश न्यायालयाने दिला. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील एन.एस. मुटकुळे यांनी १३ साक्षीदार तपासले. सहायक सरकारी वकील सविता एस. देशमुख, एस.डी. कुटे यांनीही सहकार्य केले. कोर्ट पैरवी पोलिस उपनिरीक्षक ए.डी. डोईजड यांनी सहकार्य केले.

Post a Comment