खामगावात रंगले आगळेवेगळे ‘भजन जॅमिंग’; भक्ती आणि उत्साहाचा अनोखा संगम
खामगाव (जनोपचार न्यूज नेटवर्क):येथील लायन्स क्लब खामगाव संस्कृती आणि जेसीआय खामगाव जय अंबे यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच 'भजन जॅमिंग' हा एक अतिशय नाविन्यपूर्ण आणि उत्साहवर्धक कार्यक्रम संपन्न झाला. भक्ती आणि संगीताची जोड देत आयोजित केलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
व्हॅलेंटाईन डे निमित्त 'भक्तीचा' संदेश, १४ फेब्रुवारी रोजी, जेव्हा जगभर प्रेमाचा दिवस साजरा केला जातो, तेव्हा खामगावात 'भक्ती' आणि 'ईश्वरप्रेमाचा' एक वेगळाच रंग पाहायला मिळाला. पारंपारिक भजनांना आधुनिक 'जॅमिंग' स्वरूपात सादर करून तरुणाईलाही या अध्यात्मिक प्रवाहात जोडण्याचा यशस्वी प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.
कार्यक्रमाचे नियोजन प्रोजेक्ट डायरेक्टर लॉ सुरभी मोदी , लॉ सुरभी गोयनका, जेसी डॉ प्रतिमा राठी आणि जेसी प्रियतमा खंडेलवाल यांनी चोखपणे पार पाडले. स्थानिक डी.पी. रोडवरील सनशाईन क्लिनिक आणि हॉस्पिटल परिसरातील मोकळ्या जागेत हा सोहळा पार पडला. सायंकाळी ६:३० वाजता सुरू झालेल्या या सोहळ्यात विविध भजनांचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्या साठी लायन्स क्लब खामगाव संस्कृती चे अध्यक्ष PMJF लॉ आकाश अग्रवाल व जेसीआय जय अंबे चे अध्यक्ष जेसी डॉ आनंद राठी यांनी परिश्रम घेतले.
भजन जॅमिंगमध्ये केवळ गायकच नव्हे, तर उपस्थित श्रोत्यांनीही तल्लीन होऊन सहभाग घेतला. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात खामगावकर न्हाऊन निघाले होते. "प्रेम आणि भक्तीचा असा संगम क्वचितच पाहायला मिळतो," अशा प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी व्यक्त केल्या. लायन्स क्लब आणि जेसीआयच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशी माहिती क्लब प्रसिध्दी प्रमुख लॉ राजकुमार गोयनका यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.


Post a Comment