श्री सरस्वती इंग्लिश स्कूल, अंत्रज येथे महिला दिन उत्साहात साजरा
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगांव : जागतिक महिला दिनानिमित्त श्री सरस्वती इंग्लिश स्कूल, अंत्रज येथे दिनांक 15 मार्च 2026 रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला मातोश्री पंचफुलाबाई महाले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या परिवारासोबत आध्यात्मिक कार्य, जनजागृती व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले असून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत संस्थेच्या वतीने महिला दिनानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी गावातील आशा सेविका सौ. मुरेकर ताई, सौ. कळस्कार ताई व सौ. सरस्वती सावरकर यांचाही सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेत आशा वर्कर्स महत्त्वाची भूमिका बजावत असून गरोदर माता व बालकांचे आरोग्य, लसीकरण तसेच विविध आरोग्य योजनांची माहिती घराघरात पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य त्या करत आहेत.
कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष श्री. श्रीकांतजी चोपडे यांनी महिला सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचा शिक्षणासोबत सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शाळेत स्किल डेव्हलपमेंट कोर्स, संगणक शिक्षण तसेच विविध स्पर्धा परीक्षा आयोजित केल्या जातात, अशी माहिती मुख्याध्यापिका सौ. मेघा खोडके यांनी दिली.
विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व पालकांचे योगदान याविषयी शिक्षिका सौ. रिता काळबांधे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या संचालिका सौ. भाग्यश्री चोपडे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले. कार्यक्रमासाठी परिसरातील महिला व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिला दिनानिमित्त शाळेत पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व संगीत खुर्ची स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. महिलांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त व उत्कृष्ट सहभाग नोंदवला. स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या सौ. पाकधाने, बाजोडे, बोरे, अंबिकाताई काळणे सह इतर सर्व महिलांचे संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी निमकाडे सर, शैलेश गिरी तसेच शिक्षिका सौ. अर्चना महाले, सौ. बोचरे, सौ. देशमुख, कु. इंगोले आणि कर्मचारी सहदेव वाघ, सौ. हिंगणकार यांनी अथक परिश्रम घेतले.


إرسال تعليق