अतिक्रमण हटवा, अन्यथा कारवाई
खामगाव पालिकेचा इशारा दुकानदारांनी दुकानासमोर वाहने व माल ठेवू नये; मुख्याधिकारी डॉ.शेळके
खामगाव-शहरात अतिक्रमणामुळे प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत असून नागरिकांना दैनंदिन प्रवासात मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासनाने अतिक्रमणधारकांसह शहरातील व्यावसायिकांना तातडीचा इशारा दिला आहे. नगर परिषदेकडून देण्यात आलेल्या सूचनेनुसार, सार्वजनिक रस्ते, पदपथ तसेच मोकळ्या जागांवर करण्यात आलेले अतिक्रमण त्वरित स्वखर्चाने हटवावे. शहरातील अनेक ठिकाणी दुकानदारांकडून दुकानासमोर माल ठेवणे, फूटपाथवर तात्पुरत्या शेड उभारणे तसेच ग्राहकांची वाहने रस्त्यावर उभी राहू देणे, यामुळे वाहतुकीची कोंडी वाढत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर दुकानदारांनी दुकानासमोर माल अथवा वाहने ठेवणे टाळावे आणि रस्ते व पदपथ मोकळे ठेवावेत, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. ज्या नागरिकांनी किंवा व्यावसायिकांनी सार्वजनिक जागांवर अतिक्रमण केले आहे त्यांनी ते तातडीने स्वखर्चाने हटवून नगर परिषदेला सहकार्य करावे. अन्यथा अतिक्रमण आढळल्यास पालिकेमार्फत कारवाई करून ते हटविण्यात येईल. या कारवाईसाठी लागणारा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल, असा इशारा नगर पालिका मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांनी दिला आहे.

إرسال تعليق