युद्धजन्य परिस्थितीत युवकांनी केला विजयाचा संकल्प: हनुमान जयंती निमित्त बुलढाणा जिल्ह्यात चिखली येथे तीन ठिकाणी सामूहिक 'गदापूजन' संपन्न!

चिखली बुलढाणा (प्रतिनिधी) :आज संपूर्ण जग एका अस्थिर आणि युद्धजन्य परिस्थितीच्या उंबरठ्यावर उभे असताना, हिंदू समाजात शौर्य आणि आत्मबळ जागृत करण्याच्या उद्देशाने हनुमान जयंतीचे औचित्य साधून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विशेष उपक्रम राबवण्यात आला. "रामराज्य स्थापनेसाठी" देशभरातील विविध शहरांसह  जिल्ह्यातील चिखली येथे ३ महत्त्वपूर्ण ठिकाणी सामूहिक ‘गदापूजन’ सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.

इतिहासातून प्रेरणा: विजयाचा संकल्प

या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना समितीचे प्रसाद येवले यांनी सांगितले की, "इतिहासाचे अवलोकन केल्यास असे लक्षात येते की, ज्या ज्या युद्धाच्या अग्रभागी मारुतीराय विराजमान झाले, तिथे धर्माचा विजय निश्चित झाला आहे. मग ते प्रभू श्रीरामांच्या सैन्यात राहून रावणाच्या लंकेचे दहन करणारे मारुतीराय असोत, वा महाभारतात अर्जुनाच्या रथावर ध्वजस्तंभावर विराजमान होऊन पांडवांना बळ देणारे हनुमान असोत! इतकेच नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'हिंदवी स्वराज्या'साठी समर्थ रामदास स्वामींनी गावोगावी मारुतीरायांची मंदिरे स्थापून जी बलोपासना सुरू केली, त्यातूनच स्वराज्याला आध्यात्मिक आणि सामर्थ्याचे बळ मिळाले." आज पुन्हा एकदा देश आणि धर्म संकटात असताना प्रत्येक हिंदूमध्ये मारुतीरायांसारखे शौर्य, शक्ती आणि भक्ती जागृत होणे काळाची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

विधीवत पूजन आणि सामूहिक नामजप

या सोहळ्यात गदापूजन विधी, श्री हनुमानाची आरती, मारुति स्तोत्रपठण, शंखनाद आणि सामूहिक प्रार्थना करण्यात आली. वातावरणात चैतन्य निर्माण करण्यासाठी ‘श्री हनुमते नम:’ हा सामूहिक नामजप करण्यात आला. तसेच, ‘रामराज्याच्या स्थापनेसाठी मारुतीरायांचे गुण कसे आत्मसात करावेत’ यावर विशेष प्रबोधन करण्यात आले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सर्व भाविकांनी रामराज्य स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा घेतली. गेली ४ वर्षे समिती अशा प्रकारे सामूहिक गदापूजनाचे यशस्वी आयोजन करत आहे.

जिल्ह्यातील चिखली येथे विविध ठिकाणी प्रतिसाद

चिखली शहरांत उपस्थित मान्यवर व कार्यकर्ते:यावेळी ज्यांच्या हस्ते पूजन संपन्न झाले ते योग प्रशिक्षक दिलीप पिडीयार सर, विश्व हिंदू परिषद चे प्रवीण आंभोरे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे गणेश चव्हाण, युवा हिंदुस्थानचे राहुलसिंग मोरे, हिंदू जनजागृती समितीचे प्रसाद येवले, अनिकेत पेंढारकर, विशाल भुतेकर, आकाश सांगळे,   सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.भालगाव येथील गदा-पूजन वेळी भाजपचे अमोल काकडे यांच्या हस्ते गदा पूजन झाले व गणेश भगत, योगेश भगत, दिपक भगत, गोपाल परिहार, भागवत परिहार, महेंद्र परिहार, धनंजय परिहार यांसह अनेक युवक उपस्थित होते.सवना येथील गदा पूजन वेळी ऋषी करवंदे यांनी नियोजन केले.येथील मंदिरांमध्ये तरुणाईचा आणि भाविकांचा मोठा सहभाग दिसून आला. तरुणांमध्ये हिंदुत्वाचा स्वाभिमान जागृत करणारा हा 'गदा पूजन' सोहळा जिल्ह्यासाठी एक प्रेरणादायी घटना ठरली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post