खामगावात २७ एप्रिलला ‘गो सन्मान’साठी भव्य प्रार्थना मोर्चा

खामगाव : भारतीय संस्कृतीची आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या गोवंशाला घटनात्मक संरक्षण मिळावे, या उद्देशाने देशभर सुरू असलेल्या ‘गो सन्मान आह्वान अभियान’ अंतर्गत खामगाव येथे सोमवार, २७ एप्रिल २०२६ रोजी समस्त हिंदू समाजाच्या वतीने भव्य प्रार्थना मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता श्री हनुमान मंदिर, फारशी येथून मोर्चाला सुरुवात होऊन तो उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालयावर धडकणार आहे. तेथे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या नावे विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे.

या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेतृत्वाखाली नसून ‘वेदलक्षणा गौमाता’ यांच्या दैवी संकल्पनेतून प्रेरित असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. अध्यक्षस्थानी ‘नंदी बाबा’ (वृषभ) असल्याचे सांगितले असून, हे अभियान पूर्णपणे निस्वार्थ, स्वखर्चाने आणि अहिंसक मार्गाने राबवले जात आहे. संकीर्तन आणि प्रार्थनेच्या माध्यमातून समाजजागृती करण्यावर भर देण्यात आला असून कोणत्याही प्रकारचे दान किंवा चंदा स्वीकारला जात नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, या आंदोलनातून गोवंशाला ‘राष्ट्रमाता’ दर्जा देणे, स्वतंत्र केंद्रीय गोसेवा मंत्रालय स्थापन करणे, गोवंश तस्करीविरोधात कठोर कायदे करणे तसेच गो-आधारित शेती व शिक्षणाला प्रोत्साहन देणे अशा विविध मागण्या करण्यात येणार आहेत. २७ एप्रिलपासून देशभरात तहसील स्तरावर प्रार्थना पत्र पाठवण्याची मोहीम राबवली जाणार असून, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास पुढील काळात दिल्ली येथे व्यापक आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. आयोजकांनी खामगाव शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم