मलकापूर येथे हरभरा अपहार प्रकरण उघड
5 जेरबंद; ट्रकसह मुद्देमाल जप्त
खामगाव/मलकापूर : लालमती येथील संत गजानन कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनीच्या हरभरा खरेदी प्रकरणात मोठा अपहार उघडकीस आला आहे. 12 मे 2026 रोजी 270 क्विंटल हरभरा (540 कट्टे) असा सुमारे 15.86 लाख रुपयांचा माल वखार महामंडळ, मलकापूर येथे पोहोचविण्याऐवजी अपहार करण्यात आल्याची तक्रार दाखल झाली होती.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान सुमारे 200 किमी परिसरातील 300 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला. यात शेख अमीन शेख जमील (रा. मलकापूर) याच्यासह इतर साथीदारांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्या ताब्यातून ट्रक, 118.35 क्विंटल हरभरा आणि हरभरा विक्रीतून मिळालेले 3 लाख रुपये रोख, असा एकूण 18.91 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणातील 5 आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment